जालना : इथे संक्रातीनिमित्त घेवर, फेणीची होते विक्री, दुकाने सजली, जाणून घ्या काय आहे परंपरा | पुढारी

जालना : इथे संक्रातीनिमित्त घेवर, फेणीची होते विक्री, दुकाने सजली, जाणून घ्या काय आहे परंपरा

जालना, पुढारी वृत्तसेवा : संक्रातीनिमित्त जालना शहरात घेवर आणि फेण्यांची दुकाने सजली आहेत. या राजस्थानी पदार्थाची दुकाने संपुर्ण मराठवाड्यापैकी फक्त जालन्यातच पाहायला मिळतात. सध्या बडी सडकवर घेवरची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. संक्रातीनिमित्त या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. घेवर आणि फेण्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे दर ठरलेले असून सध्या ३०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे.

घेवर, फेणी

शहरात मारवाडी समाज बांधवांचा मोठा समूह राहतो. घेवर याच समाजात जास्त प्रचलित आहे. खरं तर हा पदार्थ मूळचा राजस्थानचा, मात्र मारवाडी बांधवांमुळे जालना जिल्ह्यात सर्व परिचित व्हायला लागला आहे. घेवर संक्रांती निमित्त मोठ्या प्रमाणात विकले जाते. सध्या बडी सडकवर घेवरची दुकाने सजली आहेत. मारवाडी समाजामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी घेवर आणि फेण्यांची शिदोरी घेऊन जाण्याची पद्धत आहे. एक मिष्ठांन म्हणूनही त्याला आवर्जून मुलीच्या सासरी घेऊन जातात. हे तयार करण्याची कृती काही वेगळीच आहे. सामान्य माणसाला याची कृती जमत नाही. त्यासाठी अनुभवी व्यक्तीच लागते. विशेष करून हे तयार करण्यासाठी राजस्थानमधून आचारी बोलावले जातात. मैदा, तूप, तेल, साखरेचा पाक, आणि काही प्रमाणात लिंबू असे साहित्य यासाठी लागते. एका मोठ्या कढईमध्ये तुपात हळूहळू आकार वाढवत नेल्यानंतर एका वेळी चार घेवर तयार होतात. त्यानंतर या घेवरला साखरेच्या पाकामध्ये भिजवुन गोड घेवर तयार केले जातात. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी साधे घेवर देखील उपलब्ध आहेत. तसेच तुपातील सुकामेवा आच्छादित घेवरला देखील बाजारामध्ये मोठी मागणी आहे.

घेवर, फेणी

घेवर सोबतच फेण्या हा एक पदार्थ विकला जातो. परंतू फेण्या जालन्यात तयार केला जात नाही. तो हैदराबादमधून आणला जातो. त्याची कृती घेवर सारखीच आहे. पाच मिनिटात तयार होणारा हा पदार्थ अनेक दिवस टिकून राहतो. घेवर आणि फेण्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे प्रति किलो दर ठरले आहेत. ३०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत हे दर आहेत.

हेही वाचा :

Back to top button