ICICI bank-Videocon कर्ज फसवणूक प्रकरणी कोचर दाम्पत्याला हायकोर्टाकडून मोठा दिलासा | पुढारी

ICICI bank-Videocon कर्ज फसवणूक प्रकरणी कोचर दाम्पत्याला हायकोर्टाकडून मोठा दिलासा

पुढारी ऑनलाईन : आयसीआयसीआय- व्हिडिओकाॅन बँक कर्ज फसवणूक (ICICI bank-Videocon loan fraud case)  प्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने कोचर दाम्पत्याला मोठा दिलासा दिला. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने कोचर दाम्पत्याची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याचा निर्णय दिला आहे. त्यांची अटक ही कायद्याला धरुन नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत, तसेच आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआय न्यायालयाने २८ डिसेंबरला कोठडी  सुनावली होती. धूत यांच्यावर आयसीआयसीआय बँकेची Videocon Loan Fraud केल्याचा आरोप आहे. तर चंदा कोचर यांच्यावर पदाचा गैरवापर करून पती दीपक कोचर यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणात मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला आर्थिक लाभ देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 26 ऑगस्ट 2009 रोजी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला 300 कोटी रुपये आणि 31 ऑक्टोबर 2011 रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला 750 कोटी रुपये मंजूर करणाऱ्या समितीच्या चंदा कोचर या सदस्य होत्या. समितीच्या या निर्णयामुळे बँकेच्या नियमावलीचे आणि धोरणाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

चंदा कोचर व त्यांचे पती आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांच्यासह नुपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांखाली नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपी आहेत. (ICICI bank-Videocon loan fraud case)

Back to top button