औरंगाबाद : वृद्धाची स्वतःचा गळा चिरून आत्महत्या | पुढारी

औरंगाबाद : वृद्धाची स्वतःचा गळा चिरून आत्महत्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : आजाराला कंटाळून चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत वृध्दाने आत्महत्या केली आहे. ही घटना 6 डिसेंबर रोजी गारखेडा परिसरातील भारतनगर जवळ असलेल्या साईनगर येथे घडली होती. बापुराव विठोबा लिंगसे (80) असे आत्महत्या करणार्‍या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापुराव लिंगसे हे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. त्यांना पाच मुली असून सर्वांचा विवाह झालेला आहे. काही दिवसांपूर्वी लिंगसे यांच्या पायाला मार लागला होता. उपचार करूनदेखील वेदना कमी होत नव्हत्या. होणाऱ्या वेदनांच्या त्रासाला कंटाळून लिंगसे यांनी 6 डिसेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजता चाकूने स्वतःचा गळा चिरला. दरम्यान गळा चिरून घेतल्यानंतर होणारा त्रास असह्य होत असल्याने ते जोरात ओरडले.

लिंगसे यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे कुटुंबीय जागे झाले. लिंगसे यांना रक्ताच्या थारोळयात पाहून त्यांना धक्का बसला. कुटुंबीयांकडून शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी(दि. 10) पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून याचा अधिक तपास पोलिस हवालदार डी. जी. जाधव व महेश गोले करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button