बोलेरो पिकअप अंगावरुन गेल्याने तीन वर्षाची बालिका ठार | पुढारी

बोलेरो पिकअप अंगावरुन गेल्याने तीन वर्षाची बालिका ठार

शिये ; पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे माळवाडी परीसरातील आन्वर स्क्रँप येथे महिंद्रा बोलेरो पिकअप माल गाडी अंगावरुन गेल्यामुळे तीन वर्षाची परप्रांतीय बालिका गाडीखाली चिरडुन जागीच ठार झाली. दिपा रामजी शर्मा असे मयत झालेल्या बालीकेचे नाव आहे.

शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामजी जोखू शर्मा (वय वर्षे ३५ रा.मुळगाव मंडश्री रामगड ता. भवानीपूर, जि. पटणा , राज्य बिहार ) हे नोकरी निमित्ताने पुलाची शिरोली येथे रहात आहेत. बुधवारी दुपारी त्यांची मुलगी दिपा ही दारात खेळत होती. दरम्यान राजू देसाई हे बोलेरो महिंद्रा ( क्र. एम एच ०९ सीए / ९२८८ ) या मालवाहतूक गाडीतून स्क्रॅप घेऊन आला होता. ती गाडी डेपोमध्ये लावण्यासाठी पाठीमागे न पहाता गाडी जोरात रिव्हर्स आणली. यावेळी ती गाडी दिपाच्या अंगावर गेली आणी कोवळी कळी चिरडली. यात तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

याची फिर्याद तिचे वडील रामजी शर्मा यांनी गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी बुधवारी दुपारी घडलेल्या या ह्दयद्रावक आणी गंभीर स्वरुपाच्या या घटनेची नोंद गुरुवारी पोलीसात दाखल झाली. बेजबाबदार चालकाच्या हलगर्जीपणाने मृत्यूने परीसर हळहळला आहे.

चालक राजू बाळू देसाई याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.‌ पुढील तपास स.पो.नि. राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चौरे हे करीत आहेत.

Back to top button