

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : चार महिन्यांपूर्वी विभक्त झालेला पती अचानक भेटून पत्नीला त्रास द्यायला लागला. रस्त्यात गाठून मारहाण करायला लागला. त्यामुळे पत्नीने त्याच्याशी सलगी साधत आधी त्याला फिरायला नेले. पत्नीने त्याला मनसोक्त दारू पाजली. त्यानंतर नवीन धुळे-सोलापूर हायवेला नेऊन १८ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहा वाजता वाल्मीनाका उड्डाणपुलाजवळ त्याच्या डोळ्यात स्प्रे मारून पोटात चाकूने वार करीत त्याचा काटा काढला. तब्बल बारा दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली असून गुन्हे शाखा आणि सातारा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ( Aurangabad Crime News )
विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25, रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय आणि सारिका यांचे पटत नसल्यामुळे ते चार महिन्यांपासून विभक्त राहत होते. विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहत होती. यादरम्यान सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. ते नियमित भेटू लागले. याची माहिती विजय याला मिळाली. तो सारिकाला त्रास देत होते. तसेच तिला रस्त्यावर भेटून मारहाण करत होता.
सारिकाने विजयचा काटा काढायचा कट रचला. यासाठी त्याच्याशी पुन्हा सलगी वाढवली. 18 ऑक्टोबरला सारिकाने विजयला फोन केला. त्याला सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. त्यापूर्वीच तिने चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. ते फिरायला जाताना पर्समध्ये सोबत घेतले. फिरायला गेल्यावर ते दोघे दारू पिले. मात्र, आधीपासूनच तयारीत असलेल्या सारिकाने विजयला जास्तीची दारू पाजली. रात्र झाली तरी ती त्याला दारू पिण्यासाठी गळ घालित राहिली. रात्री साडेदहानंतर ते दोघे नवीन धुळे-सोलापूर हायवेवर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ गेले. भररस्त्यावर सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला. यानंतर त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. विजय रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. त्याला काहीसे बाजुला सारून तिने प्रियकर सागर सावळेला फोन लावला. घटनास्थळी बोलावून घेतले.
सागर सावळेचे बीएसस्सीचे शिक्षण सुरु आहे. तो फेसबुकवरून सारिकाच्या संपर्कात आला. ऑनलाइन मैत्रीतून त्यांच्या प्रेम फुलले. 18 ऑक्टोबरला रात्री सारिकाने त्याला काहीही न सांगता घटनास्थळी बोलावले. तो तेथे पाेचला. मात्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करायला नकार दिला. त्यानंतर सारिकाने त्याला बदनामी करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल केले. तुझ्यासोबतचे फोटो पोलिसांनी दाखवून खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली. त्यामुळे सागरने तिला रस्त्यावरील मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या गर्द झाडीत फेकण्यासाठी मदत केली. 18 ऑक्टोबरच्या रात्री फेकलेला मृतदेह 28 ऑक्टोबरला आढळून आला. त्यावरून सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सातारा ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, संभाजी गोरे, शंकर शिरसाठ यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, अमोल म्हस्के, कल्याण शेळके, रावसाहेब जोंधळे, सहायक फौजदार सतीश जाधव, शेख हबीब, अंमलदार सुधाकर मिसाळ, राजेंद्र साळुंके, संजय मुळे, संजयसिंह राजपूत, नवनाथ खांडेकर, संदीप बिडकर, रवींद्र खरात, धनंजय सानप, संजिवणी शिंदे, दिपाली सोनवणे, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने तपास करून मृतदेह विजय पाटणी यांचा असल्याचे उघडकीस आणले. त्या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात सारिका हिनेच पती विजय बेपत्ता झाला असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात सारिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली. कबुलीनंतर सागर सावळेचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर खूनाला वाचा फुटली.
हेही वाचा :