वडगाव निंबाळकर : वारकरी संप्रदायात परमार्थही झाला महाग | पुढारी

वडगाव निंबाळकर : वारकरी संप्रदायात परमार्थही झाला महाग

वडगाव निंबाळकर; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील दोन गावांंमध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी महाराष्ट्रातील दोन बड्या कीर्तनकारांनी सहा महिने अगोदरच तारखा निश्चित केल्या होत्या. परंतु, ऐनवेळी त्यांनी जादा मानधनाची मागणी करीत येण्यास नकार दिला. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

बारामती शहरानजीकच्या एका गावातील ग्रामस्थांना सहा महिन्यांपूर्वी एका कीर्तनकाराने कीर्तनासाठी तारीख दिली होती. महाराजांना भेटण्यासाठी ग्रामस्थ गेले असताना त्यांनी मोठ्या आनंदाने येण्याचे कबूल केले होते. त्यानंतर कार्यक्रम जवळ आल्यानंतर ग्रामस्थांनी आठवण करून देण्यासाठी महाराजांना फोन केला. तेव्हा त्यांनी 40 हजार रुपये मानधन होईल, असे सांगितले.

आमचे गाव लहान आहे, वर्गणी फारशी जमत नाही. काहीतरी जमवून घ्या, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. त्यावर तुमच्या बजेटमधील महाराज बघा, मला कार्यक्रमाला येणे शक्य नाही, असे उत्तर या महाराजांनी दिले. त्यामुळे ग्रामस्थ चकितच झाले. जिरायती भागातील एका गावाबाबत असाच प्रकार घडला. तेथेही अन्य एका महाराजांनी 40 हजार मानधन द्या; अन्यथा मला बोलावू नका, असे बिनदिक्कतपणे सांगून टाकले.

राज्यातील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे म्हणता येतील. यावरून वारकरी संप्रदायातही परमार्थ महाग झाल्याचे उद्विग्न उद्गार वारकर्‍यांच्या तोंडून निघत आहेत. संतांनी रचलेल्या अभंगावर दोन तास कीर्तन केले जाते. त्या चार ओळीच्या अभंगावर बोलण्यासाठी चाळीस हजार रुपये घेत असतील, तर ज्यांनी अभंग रचना केली, त्यांना किती यातना होत असतील, असे मत पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बारवकर यांनी व्यक्त केले.

‘श्री संत तुकाराम’ चित्रपटातील संत तुकारामाची भूमिका करणारे विष्णुपंत पागनीस यांनी चित्रपटातील मानधनाची सर्व रक्कम वारकरी संस्थेला दान दिली होती. वारकरी संप्रदायासाठी हयात घालणार्‍या बंडातात्या कराडकर यांनी आपल्या सामाजिक जाणिवेने गावोगावी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कीर्तनकारांच्या पैशांच्या मागणीने भाविकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे व सचिव दत्तात्रय भोसले यांनी कीर्तनासाठी अवाच्या सव्वा रकमेची मागणी करणार्‍या शिक्षकांवर बहिष्कार घातला पाहिले. संप्रदायाच्या नियमानुसार आचरण करणारे चांगले कीर्तनकार आम्ही उपलब्ध करून देण्यास केव्हाही तयार आहोत, असे सांगितले.

Back to top button