

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: वाल्हे (ता. पुरंदर) नजीक भुजबळ कामठवाडी येथील शेतकर्याने मजूर टंचाईच्या प्रश्नावर एक अल्प खर्चाचा पर्याय शोधून काढला. शेतातील अर्धा ते पाऊण ट्रॉली इतक्या सूर्यफुलाच्या बिया काढण्यासाठी (भरडण्यासाठी) लागणारा खर्च वाचवत केवळ 50- 70 रुपयांत सूर्यफुलाच्या बिया काढून शेतकर्यांपुढे एक नवा पर्याय उभा केला आहे.
भुजबळ कामठवाडी येथील शेतकरी संभाजी गोविंद भुजबळ यांनी त्यांच्या शेतामधील बाजरीबरोबरच सूर्यफुलाचे आंतरपीक घेतले होते. आंतरपिकातून त्यांना तब्बल अर्धा ते पाऊण ट्रॉली भरून सूर्यफुलाचे उत्पादन निघाले. मात्र, ते भरडण्यासाठी मशिनही मिळत नव्हते. मशिन उपलब्ध झाली तर त्याला सूर्यफुलाच्या बिया चाळणारी चाळणच उपलब्ध नसल्याने, मोठा प्रश्न उभा राहिला होता.
सहज बसल्या बसल्या गंमत म्हणून त्यांनी आपली दुचाकीमधील स्टँडला लावून चालू करून मागील फिरत्या चाकाला एक सूर्यफुलाचे कणीस धरून पाहिले. गंमत म्हणून केलेल्या या प्रयोगाला चांगलेच यश आले. हातातील सूर्यफुलाच्या सर्व बिया अगदी सहजरीत्या निघाल्या. सूर्यफूल भरडायला येणारा खर्च आणि मजुरी यांचे गणित केल्यानंतर मोटारसायकलच्या चाकांनी सूर्यफूल भरडण्याचा पर्याय त्यांना अल्प खर्चिक वाटल्याचे भुजबळ यांनी सांगितले.