वाशिम : टोल प्लाझावर मनसेचे टोल बंद आंदोलन, ३ तास टोल वसुली बंद | पुढारी

वाशिम : टोल प्लाझावर मनसेचे टोल बंद आंदोलन, ३ तास टोल वसुली बंद

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम तालुक्यातील तोंडगावजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील टोल प्लाझाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे गेल्या महिन्यात हा टोलनाका कोसळला आहे. याप्रकरणी संबंधीत अधिकारी व कंत्राटदावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या वतीने आज दुपारी (२० ऑक्टोंबर) रोजी वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे व मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात टोल बंद आंदोलन करण्यात आले. यादरम्यान जवळपास ३ तास टोल वसुली बंद ठेवण्यात आली होती.

या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष रवि वानखडे, फकीरा करडीले, मनसे सैनिक दिलीप कव्हर, बाळू विभुते, उमेश टोलमारे, जतीन सोनवणे, नागेश इंगळे, देविदास जैताडे आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनाची दखल घेवून कंत्राटदारावर कारवाई न केल्यास पुढील काळात टोलफोडो आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समृध्दी महामार्ग अधिकारी लठाड यांना निवेदन देण्यात आले.

यात तोंडगावजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील टोल प्लाझाचे बांधकाम ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अचानक कोसळले. यात कुठलीही जिवित हानी झाली नाही. परंतु, टोल प्लाझाचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ते अचानक कोसळले. यामध्ये वापरलेले टिनशेडही निकृष्ट दर्जाचे आहेत. याबाबत संबंधीतांवर कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या वतीने या प्रकरणाची ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ३० सप्टेंबर रोजी लेखी स्वरुपात तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी उलट संबंधित टोल प्लाझाला पोलीस संरक्षण देवून बंद झालेला हा टोल नाका पुन्हा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परंतु, संबंधित टोल प्लाझाची मुदत संपली असताना सुद्धा हा टोल नाका अनाधिकृतपणे सुरु करून टोल वसुली सुरु आहे. त्यामुळे टोल प्लाझा कोसळल्याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई होईपर्यत व संबंधीत टोल नाक्याचे छताचे व पोलचे काम मजबूत होईपर्यत कोणत्याही वाहनाला टोल आकारण्यात येवू नये, टोल प्लाझाला पोलीस संरक्षण देण्यात येवू नये, पोलीसांकडून दिलेले आदेश देण्यात त्वरीत मागे घेण्यात यावे, (जेणेकरुन येथून येणार्‍या- जाणार्‍या वाहनधारकांची जीवित हानी होणार नाही), संबंधीत टोल नाक्यावर महामार्गाच्या नियमानुसार वाहनधारकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, महिला व पुरुषांना प्रसाधने गृह नाहीत, तातडीच्या प्रसंगी कोणतीही वैद्यकिय सुविधा उपलब्ध नाही, नांदेड बायपास अजुन पुर्ण झाला नसून त्याचेही काम अपुर्ण आहे, संबंधीत महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत यासारखे प्रश्न निवेदनात नमूद केले आहेत.

तसेच वाहतुक सेनेने दिलेल्या निवेदनावर कोणतीच कार्यवाही न करता पुन्हा टोल नाका सुरु करुन टोल वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे टोल नाके निर्माण करणारे जबाबदार कंत्राटदार व अधिकार्‍यावर त्वरीत कारवाई करावी व तोपर्यत टोलनाका सुरु करु नये या मागणीसाठी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने टोलबंद आंदोलन राबविण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button