१०० मुलांच्या मृत्यूनंतर इंडोनेशियात सर्व खोकल्याच्या पातळ औषधांवर बंदी – Indonesia Bans All Syrup | पुढारी

१०० मुलांच्या मृत्यूनंतर इंडोनेशियात सर्व खोकल्याच्या पातळ औषधांवर बंदी - Indonesia Bans All Syrup

निकृष्ट खोकल्याच्या औषधांमुळे इंडोनेशियात १०० मुलांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन – निकृष्ट दर्जाच्या खोकल्याच्या औषधामुळे इंडोनेशियात १०० मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकार लक्षात येताच इंडोनेशियात सर्व प्रकारच्या द्रवरूपातील खोकल्यांच्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. आफ्रिकेतील गांबिया या देशातही निकृष्ट खोकल्याच्या औषधामुळे ७० मुलांचा मृत्यू झाल्याचे स्‍पष्‍ट झाले हाेते. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Indonesia Bans All Syrup)

इंडोनेशियातील संबंधित औषधं ही स्थानिक आहेत की आयात केलेली, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. खोकल्याच्या औषधातील काही घटक हे किडनी निकामी होण्याला कारणीभूत ठरतात याला Acute Kidney Injuries (AKI) म्हणतात. या वर्षी इंडोनेशिया AKIच्या २०६ घटना लहान मुलांत दिसून आल्या आहेत. यातील १०० मुलांचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे.

इंडोनेशियाचे आरोग्य मंत्री बुडी गुनाडी सदिकिन यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “या मुलांनी घेतलेल्या खोकल्याच्या औषधात Ethylene glycol आणि Diethylene glycol हे घटक आढळून आले आहेत. हे घटक किडनी निकामी होण्याला कारणीभूत ठरतात. हे घटक या औषधांत असणे अपेक्षित नव्हते. या संदर्भात चौकशी सुरू आहे.” जे औषध गांबियामध्ये वापरले होते, त्याची विक्री इंडोनेशियात होत नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

नेमक्या कोणत्या ब्रँडची ही औषधे आहेत, हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही. या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने गांबियातील ७० मुलांच्या मृत्यूसाठी खोकल्याचे औषध जबाबदार असल्याचे म्हटले होते. भारतातील Maiden Pharmaceuticals Limited या कंपनीने बनवलेल्या Promethazine oral solution, Kofexmalin baby cough syrup, Makoff baby cough syrup आणि Magrip N cold syrup या औषधांमुळे हे मृत्यू झाल्याचे उघकीस आले आहे. भारत सरकारने या कंपनीवर कारवाई केली आहे.

हेही वाचा

Back to top button