संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंची रणनिती, संजय देशमुख यांनी हाती घेतली 'मशाल' | पुढारी

संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंची रणनिती, संजय देशमुख यांनी हाती घेतली 'मशाल'

मुंबई/यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; माजी मंत्री संजय देशमुख यांनी आज गुरुवारी (दि.२०) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. संजय देशमुख हे दिग्रसचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक मानले जातात. संजय राठोड हे सध्या शिंदे गटात आहेत. उद्धव ठाकरेंनी आता थेट संजय देशमुखांना आपल्यासोबत घेत मंत्री संजय राठोडांना आव्हान देण्याची रणनिती आखली आहे.

संकटाच्या काळात ज्यांनी आपली पाठराखण केली त्या उद्धव ठाकरेंना संजय राठोड दगा देणार नाहीत अशी चर्चा असतानाच राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना शह देण्यासाठी ठाकरेंनी संजय देशमुखांचा पक्षात प्रवेश घडवून आणला आहे.

संजय देशमुखांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला होता. १९९८ मध्ये त्यांचा दिग्रस मतदारसंघात पराभव झाला होता. पुढे १९९९ मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमूख झाले. मात्र, विधानसभेचं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली. अन चमत्कार घडवत फक्त १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला. यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मंत्रिमंडळात ते युवक आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री झाले होते. २००४ मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर फेररचना झालेल्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेच्या संजय राठोडांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

२०१९ च्या लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. मात्र, सेनेशी युती असल्याने आणि तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करीत तब्बल ७५ हजार मते घेतली. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-दिग्रस मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी येण्यासाठी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून या मतदारसंघात संजय राठोड यांना शह देणारे असे नेतृत्व म्हणजे संजय देशमुख हेच आहे. संजय राठोड यांना शह देणारा दुसरा नेता या मतदारसंघात नाही. तसेच संजय देशमुख यांचीही उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून आपले राजकीय भविष्य निश्चित करायची इच्छा आहे.

एकेकाळी दारव्हा मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा होता आणि माणिकराव ठाकरे नेते होते. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची अवस्था फार दयनीय झाली आहे. अशा वातावरणात येणारी निवडणूक ही शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी होणार आहे. त्यातच बंजारा समाजाचे पोहरदेवीचे महंत सुनील महाराज यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. बंजारा समाज आणि मराठा-कुणबी समाज यांची मोट बांधून उद्धव ठाकरे यांची नाव पैलतीरी नेण्याचा पण संजय देशमुख यांनी केला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button