आज या, उद्या त्या गटात कोलांट्याउड्या ! जेऊर ग्रामपंचायतीत सगळे अलबेल | पुढारी

आज या, उद्या त्या गटात कोलांट्याउड्या ! जेऊर ग्रामपंचायतीत सगळे अलबेल

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून गावातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. कोण विरोधक अन् कोण सत्तेत, हे ग्रामस्थांनाच काय? खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनाही समजायला तयार नाही. अशी विदारक परिस्थिती जेऊरमध्ये पहावयास मिळतेय. ग्रामपंचायत सदस्य सदस्यांमध्ये गट पडत असून, तरी ते कोणत्याही एका गटा सोबत कधीच एकनिष्ठ दिसून आले नाही. आज एका गटात, तर उद्या दुसर्‍या गटात असा कोलांट्याउड्या मारण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्यांमध्ये दिसून येतो.

नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतमध्ये अजब कारभार सुरू असून, ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उदासीनता आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडून होणार्‍या कामाची अपेक्षा करणे सोडून दिल्याने ग्रामपंचायत कार्यालय सुनेसुने झाले. जेऊर ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेला अलबेल कारभार हा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राजकारणाचा विचित्र प्रकार पाहावयास मिळाला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाविरोधात निवडणूक लढविणार्‍या गाव नेत्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच वितुष्ट निर्माण झाले. निवडणुकीत तीन गट पडले अन् त्यातच जेऊर ग्रामस्थांनी कोणालाही स्पष्ट बहुमत न दिल्याने परिस्थिती अजूनच बिघडली. कर्डिले गटाला 17 पैकी आठ जागा मिळाल्या.

सत्ता स्थापनेसाठी एक जागा कमी पडली होती. त्याच क्षणी विद्यमान उपसरपंच श्रीतेश पवार यांनी कर्डिले गटात सामील होत त्यांना पाठिंबा दिला. कर्डिले गटाने सत्ता स्थापनेचा आकडा पूर्ण केला होता. परंतु, माजी मंत्री कर्डिले यांनी त्यापुढे जात विरोधात निवडून आलेल्या उमेदवारांना आपल्या गटात सामील करून घेत सरपंचपद बहाल केले. सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार वास्तविक कर्डिले गटाच्या विरोधात निवडून आलेले. कर्डिलेंनी काही स्थानिक नेत्यांचे मतही विचारत घेतले व मगच निर्णय घेतला. कर्डिलेंची राजकीय खेळी यशस्वी होऊन संपूर्ण गाव एक होईल अशी अपेक्षा होती; परंतु सरपंच-उपसरपंच निवड झाल्यानंतर लगेच कर्डिलेंच्या कट्टर समर्थकांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली.

कर्डिलेंच्या मनात काय?
निवडणुकीपूर्वी कर्डिले यांच्या विरोधात बोलणारे, विरोध करणारे ठराविक स्थानिक नेते कर्डिले यांच्यासोबत दिसून आले; परंतु ते मनातून कोणाचे कार्यकर्ते आहेत, हा संशोधनाचा विषय. दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले होते. यावरून ग्रामपंचायतच्या कारभाराची जाणीव होते. कर्डिले राजकारणातील मुरब्बी नेते म्हणून समजले जातात. त्यामुळे जेऊर गावातील चालू असलेल्या या कुरघोडीबाबत ते अनभिज्ञ निश्नितच नसणार; परंतु त्यांच्या मनात काय चालले? हे येणारा काळच ठरवेल.

‘माजी मंत्र्यांनी लक्ष घालावे’
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना राजकारणातील मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. जेऊर गाव त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. येथील जवळजवळ सर्वच ज्येष्ठ नेते कर्डिलेंचा शब्द टाळत नाहीत. त्यामुळे कर्डिलेंनीच जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या कारभाराबाबत लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Back to top button