हिंगोली : बोगस बांधकाम मजुरांमध्ये धनदांडग्यांची नावे, गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू | पुढारी

हिंगोली : बोगस बांधकाम मजुरांमध्ये धनदांडग्यांची नावे, गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : ग्राम विकास अधिकारी यांच्या सह्या व शिक्के असलेले बांधकाम कामगाराचे १२६३ नावांची यादी असून यामध्‍ये आखाडा बाळापूर परिसरातील काही धनदांडग्याची नावांचा समावेश असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तयादीतील काहींना लाभ मिळाला आहे का? यांचीही चौकशी केली जात आहे. याबाबत आखाडा बाळापूर येथे मंगळवारी (दि. ४ आक्टोबर) रोजी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत सविस्तर असे की, आखाडा बाळापूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकाऱ्याची सही व शिक्के असलेले बांधकाम मजुराचे बोगस फॉर्म भरून कामगार कार्यालय हिंगोलीकडे सादर करण्यात आले होते. त्यामध्ये १२६३ नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये बनावट सही व शिक्क्याचे असलेल्या फॉर्मवर काही धनदांडग्याचे फोटो, मोबाईल नंबर असल्याचे दिसत आहे. ही नावे परस्पर फोटो घेऊन, सह्या बोगस करून, अन्य ठिकाणाहून पासपोर्ट मिळवून फॉर्म भरले किंवा काय तथ्य आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू होणार आहे. ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. क्षीरसागर हे मंगळवारी रोजी पोलीस ठाणेमध्ये बोगस मजुरांच्या यादी आणि फोटोसह तक्रार दाखल करण्यासाठी स्वतःहून हजर झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

बांधकाम मजुरांसाठी एखाद्या बांधकाम एजन्सीकडे ९० दिवसांचे काम केल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने तसे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे बंधनकारक आहे. परंतु, यामध्ये बोगस फॉर्म भरणाऱ्या टोळीने गावोगावचे विशेषतः पर तालुक्यात म्हणजे, वसमत, औंढा, नांदेड आदी तालुका जिल्ह्यातून मजुरांची नावे हस्तगत व फोटो सुद्धा हस्तगत केले यानंतर ही यादी तयार केली आहे. यावेळी नावे दाखल केल्यानंतर मजुरांना त्याच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये रोख, एक कामगार किट, पायातील बूट, कामावरचा झुला, बॅटरी यादी साहित्य मिळते.  बांधकाम कामगार अथवा त्याची पत्नी प्रसूती झाल्यास तीस हजार रुपये रोख बँक खात्यावर जमा होतात. पाल्यांना शिष्यवृत्ती व घरकुलाचा लाभ मिळतो असे हे शासनाचे लाभ घेण्यासाठी बोगस बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे या प्रकरमाची चौकशी पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button