चाकण शहरात सम-विषम पार्किंग फलक लावणे सुरू | पुढारी

चाकण शहरात सम-विषम पार्किंग फलक लावणे सुरू

चाकण, पुढारी वृत्तसेवा: चाकण शहरात विशेषतः अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने सम-विषम पार्किंग व्यवस्थेचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

वाढलेली वाहनसंख्या, खासगी वाहनांचा वापर, बेशिस्त पार्किंग आदी समस्यांमुळे वाहतुकीस नेहमी मोठा अडथळा निर्माण होतो. त्यावर नियंत्रणासाठी चाकण नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने सम-विषम पार्किंग व्यवस्थेचे फलक लावले आहेत. वाहनधारकांनी योग्य पार्किंग न केल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. चाकणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. चाकण ही मोठी बाजारपेठ असून, परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिक, एमआयडीसीमधील कामगार, मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येतात.

बँका तसेच येथील कापड, सराफ, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, कृषी, फुटवेअर आदी ठिकाणी साहित्य खरेदीसाठीही आसपासच्या गावांतील ग्राहकांची मोठी गर्दी होते. माणिक चौक ते मार्केट यार्ड यादरम्यान जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर दोन्ही बाजूने दुकानासमोर वाहनांची नेहमी मोठी वर्दळ असते. इतर वाहनधारकांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे चाकण पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे चाकण नगरपरिषद प्रशासनाने सम-विषम पार्किंगचे फलक जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर उभे करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण शहरात हे फलक लावल्यानंतर वाहने सम-विषम तारखेला उभी केली जाणार असल्याचे चाकण पालिका प्रशासनाने सांगितले.

सर्वाधिक वर्दळीचे रस्ते

माणिक चौक ते जिल्हा परिषद प्रशाला, नगरपरिषद ते महात्मा फुले चौक व नगरपरिषद ते चाकण पोलिस स्टेशन, महात्मा फुले चौक ते मार्केट यार्ड, जय महाराष्ट्र चौक ते बाजारपेठ, माणिक चौक ते मुटकेवाडी चौक, आंबेठाण चौक ते आंबेठाण रोड आणि पुणे-नाशिक महामार्ग या सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजूने दुकानासमोर वाहनांची नेहमी मोठी वर्दळ असते.

Back to top button