रायगड: शहीद राहुल भगत यांच्या पार्थिवावर आज रात्री उशीरा होणार अंत्यसंस्कार | पुढारी

रायगड: शहीद राहुल भगत यांच्या पार्थिवावर आज रात्री उशीरा होणार अंत्यसंस्कार

महाड; पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्यदलात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेले व सध्या बारामुल्ला भागात कर्तव्यावर असलेले महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावातील राहुल आनंद भगत यांना दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथे झालेल्या अतिरेक्याच्या चकमकीत वीरगती प्राप्त झाली. त्यांचे पार्थिव मिळण्यास विलंब झाल्याने आज (दि.४) सकाळी होणारे अंत्यसंस्कार आज रात्री उशिरा इसाने कांबळे येथील वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील, अशी माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली आहे.

राहुल यांना शालेय जीवनापासूनच सैन्य दलाबद्दल ओढ होती. विविध खेळांबाबत त्यांना विशेष आवड होती. नेमबाजी त्यांचा आवडता खेळ होता. गणेशोत्सवामध्ये ते आपल्या गावी आले होते. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपूर्वी राहुल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आईवडिलांशी व भावाशी संपर्क साधला होता.

दरम्यान, राहुल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपंच राघोबा महाडिक, ग्रामसेवक नितेश सातव यांनी तयारी सुरू केली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सहकार्याने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने स्मशान शेड येथे अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावरील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम मंगळवारी दुपारी बारा पर्यंत सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक पप्पूशेठ निकम यांच्या व लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. या मार्गावर विशेष पथदिवे व संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

भारतीय सैन्यदलाकडून रायगड जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा सैनिक बोर्ड यांच्याशी अथवा स्थानिक प्रशासनाशी अंत्यसंस्काराच्या वेळेसंदर्भात दुपारपर्यंत कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आली. या संदर्भात दिल्ली व मुंबई येथील शासकीय यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचे प्रांताधिकारी पुदलवाड यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button