ताथवडे : विजेचे खांब देताहेत अपघाताला निमंत्रण | पुढारी

ताथवडे : विजेचे खांब देताहेत अपघाताला निमंत्रण

ताथवडे, पुढारी वृत्तसेवा: येथील पुणे-मुंबई महामार्गावरील ताथवडेतील सेवा रस्त्यावर असलेले विजेचे खांब एका बाजूला झुकल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. ताथवडे येथील आजूबाजूच्या परिसरात प्रशासनाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या खांबावरील पथदिवे निखळले आहेत. यातच भर म्हणून ताथवडे येथील सेवारस्त्यावरील विजेचा खांब एका बाजूला झुकलेला असून, यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्याच्या आजूबाजूला अनेक नामांकित शाळा, कॉलेजेस आहेत.

येथून शेकडो विद्यार्थी प्रवास करत असून हा खांब पडून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. असे झाल्यास याला जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्न येथील रहिवाशांनी केला आहे. शेजारीच महामार्ग असल्याने येथून वाहने भरधाव जातात. एखाद्या वाहनाचा धक्का लागून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे हा खांब काढून टाकावा, अशी मागणी होत आहे.

आम्ही येथे बाजूलाच राहतो, शेजारी शाळा, कॉलेजेस आहेत. आम्हा सर्वांना या विजेच्या खांबामुळे येथून प्रवास करताना भीती वाटते. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण? महावितरण कंपनीने हा खांब लवकरात लवकर काढून टाकावा.
– सुर्ज्या महापात्रो, स्थानिक रहिवाशी

Back to top button