हिंगोली : पिंपळदरी गावात गेल्या पंधरा दिवसापासून अंधार, महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे समस्येत वाढ | पुढारी

हिंगोली : पिंपळदरी गावात गेल्या पंधरा दिवसापासून अंधार, महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे समस्येत वाढ

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : जलाल दाभा येथे तार तुटून जीवित हानी टळली तर पिंपळदरी गावात गेल्या पंधरा दिवसापासून अंधार आहे.  औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाबा येथे 33 केव्ही टेंभुर्याकडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा तार तुटून दहा ते पंधरा कुटुंब जीवित हानीपासून बचावले; पण अशा अपघाताच्या प्रमाणात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच पिंपळदरी येथील गावातील ट्रांसफार्मर गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे दुर्गा उत्सव काळात गावात अंधाराचे साम्राज्य आहे.  पाचशे ते सातशे कुटुंब दळण दळण्यासाठी इतर गावात जाऊन पोटाची भूक भागवत आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी सुद्धा गणपती उत्सव काळात येथील ट्रांसफार्मर जळाल्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य होते.

वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे आणि गेल्या दोन महिन्यापासून पिंपळदरी जलाल दाबा, फुलदा बाद काकड दाबा या गावांना लाईनमेनच उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसाधारण वीज वितरण कंपनीची तांत्रिक कामे खाजगी कामगाराकडून करून घेतली जातात. असे कामगार गरजू लोकांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळतात. उदा. वीज वितरण कंपनीकडून काही काम करून घ्यायचे असल्यास टेबूरधरा 33 केवी येथून फक्त परमिट घेण्यासाठी तीनशे रुपये गरजूंना मोजावे लागतात.

…तर आंदोलन करु

गेल्या दोन महिन्यापासून या गावांना लाईन मेन नसल्यामुळे कित्येक कामे स्थगित आहेत. काल (दि.26) सायंकाळी विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. पावसामध्ये जलाल दाबा येथे मुख्य वीज वाहिनीची तार तुटली. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अशा गंभीर बाबीकडे वीज वितरण कंपनीने तात्काळ लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्राहकाच्या आंदोलनाला सामोरे जावे असे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संजय भुरके, माजी सभापती बाबुराव पोले, पिंपळदरीच्या सरपंच सौ. रत्नमाला संजय भुरके, सुदाम खोकले, माणिकराव कर्डिले, उत्तमराव कदम, केशव ठोंबरे, बापूराव घोंगडे, आदींनी केले आहे

हेही वाचलंत का?

Back to top button