मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला लाज वाटणारे कृत्य; थापा यांच्या प्रवेशावर शिवसेनेची टीका | पुढारी

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला लाज वाटणारे कृत्य; थापा यांच्या प्रवेशावर शिवसेनेची टीका

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : टेंभी नाका येथील अंबे मातेच्या आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी चंपासिंह थापा व मोरेश्वर राजे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात लाज वाटणारे कृत्य केले आहे, अशी टीका ठाणे शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी केली. या प्रवेशातून मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचं होतं? मातोश्रीवर बाळासाहेबांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी काम करत आहेत. सफाई कामगार, जेवण बनवणारे, वाढपे, सुरक्षारक्षक यांनाही शिंदे गटात घेणार का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बाजावलेले मोरेश्वर राजे यांनी सोमवारी टेभी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत शिंदे गटात प्रवेश केला. यावर ठाणे शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे घराण्यावरील द्वेषापोटी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा निवासस्थानी हा प्रवेश घडवून आणला असता तर एकवेळ क्षम्य होतं. परंतु देवीच्या आगमनावेळी केलेले कृत्य मुख्यमंत्र्यांना शोभणारे नसल्याचे कारखानीस यांनी म्हटले आहे.

थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत होते. शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी त्यांना भरपूर मदत केली होती. शिवसेना प्रमुख स्वर्गवासी झाल्यानंतर थापा यांनी नेपाळला जाण्याचे ठरवले. त्यावेळी सुद्धा त्यांना नेपाळला सन्मानाने पाठविण्यात आले. परंतु नेपाळमध्ये त्यांचे मन रमले नसावे आणि ते मुंबईला परत आले. नोकरी सोडल्यामुळे त्यांना मातोश्री वरती पुन्हा रुजू करून घेतले नसावे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ते गेले असतील. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र या गोष्टीचे भांडवल करत त्यांचा प्रवेश धार्मिक मिरवणुकीत करून घेतला, हे कृत्य योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button