औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत आता शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या मुलीच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०१८ आणि २०१९-२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करत अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये ठेवला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द तर केलीच. परंतु त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेऊन अशा एकूण ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या परीक्षेत राज्यभरातील ७,८७४ शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे आली. अपात्र असतानाही गुणांमध्ये फेरफार करून अंतिम निकालात पात्र ठरविण्यात आल्याचा ठपका परिक्षार्थींवर ठेवण्यात आला आहे. या यादीत औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांची मुलगी नुपूर मधुकर देशमुख हिच्या नावाचा समावेश आहे.
माझ्या मुलीने टीईटी परीक्षा दिली होती. पण तिने या परीक्षेचा कोणताही लाभ घेतलेला नाही. ती कोणत्याही अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेवर कार्यरत नाही.
– एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)