बीड : सोयाबीन धोक्यात, शेतकऱ्यांसमोर नवं विघ्न, पिकांची पाने करपू लागली | पुढारी

बीड : सोयाबीन धोक्यात, शेतकऱ्यांसमोर नवं विघ्न, पिकांची पाने करपू लागली

नेकनूर (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा : जोमात आलेल्या सोयाबीनवर पडलेल्या विघ्नाने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभे राहिले आहे. पाने पिवळी पडून करपून जात असल्याने केज तालुक्यातील बोरगाव परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फुले लागून शेंगा तयार होण्याच्या वेळेसच ही परिस्थिती ओढवली आहे. खरिपात अलीकडे प्रामुख्याने सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दोन वर्षात कापसावर बोडअळी आल्यानंतर हे पीक दूर करीत शेतकरी सोयाबीनकडे मोठ्या प्रमाणात वळले.

प्रत्येक शिवारात जवळपास सत्तर टक्के पेरा सोयाबीनचा होत असताना या पिकालाही नव्या विघ्नाने कवेत घेतले आहे. फुलातून शेंगा तयार होण्याच्या वेळेस पाने पिवळी पडून करपू लागल्याने केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सतीश वळेकर या शेतकऱ्यांने ओढवलेल्या संकटांची माहिती संबंधित विभागाला तसेच विमा कंपनीला कळवली असून, अद्याप ही कोणी शिवारात शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती इतर भागातही असून शेतकऱ्यांना या नव्या संकटांने अडचणीत आणले आहे.

Yellow mosaic या नावाचे रोग असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी पिके करपली त्याच्या आसपास असणाऱ्या पिकांना हे कवेत घेते. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांना हे विघ्न डोकेदुखी बनले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

सोयाबीनचे पाने पिवळी पडून ती काही कळण्याअगोदर करपून गेली. मागच्या पाच वर्षांत पहिल्यादा असे घडले. यामुळे दोन एकर सोयाबीनचा पाचोळा झाला. मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडे याची रीतसर तक्रार केली असून अद्याप कोणी याची पाहणी केली नाही.
– सतीश वळेकर, शेतकरी

हेही वाचा : 

Back to top button