पुणे : समान पाणीपुरवठा मीटरसाठी राजकीय अडसर | पुढारी

पुणे : समान पाणीपुरवठा मीटरसाठी राजकीय अडसर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत बसविल्या जाणार्‍या पाणी मीटर प्रक्रियेला शहरातील विविध पेठांमध्ये राजकीय दबावासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी मीटर बसविण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. दरम्यान, शहरात बसविल्या जाणार्‍या पाणी मीटरपैकी 50 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ 30 टक्केच काम पूर्ण झाले आहे. शहरातील नागरिकांना समान आणि उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि सध्या होणारी पाणीगळती थांबवण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे.

ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे 2 हजार 321 कोटी 1 लाख रुपये खर्च ग्रहित धरण्यात आला असून, त्याला पालिकेच्या मुख्यसभेने 2015 मध्ये मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 86 पाणी साठवण टाक्या, 1668.72 कि.मी लांबीची पाईपलाईन आणि 3 लाख 18 हजार 574 पाणी मीटर अशी कामे केली जाणार आहेत. मात्र, या योजनेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विघ्न येत आहे.

निविदा प्रक्रिया, मीटर खरेदी, पाण्याच्या टाक्या, भूसंपादन अशा अनेक कारणांनी ही योजना चर्चेत राहिली आहे. सध्या या योजनेतील कामे सुरू आहेत. मात्र, अपेक्षित गतीने कामे होताना दिसत नाहीत. यामध्ये राजकीय मंडळीचा विरोध हा प्रमुख अडसर आहे. सध्या शहराच्या विविध भागांत पाणी मीटर बसविण्याची कामे सुरू आहेत. आजवर 85 हजार 578 मीटर बसविण्यात आले आहेत. खरे तर आजपर्यंत 50 टक्के मीटर बसविले जाणे अपेक्षित होते, मात्र विविध कारणांमुळे केवळ 30 टक्केच काम पूर्ण झाले आहे. शहराच्या उपनगरांमध्ये मीटर बसविण्याची कामे सुरू आहेत.

मात्र, मध्यवर्ती भाग असलेल्या विविध पेठांमध्ये पाणी मीटर बसविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या नळाला मीटर बसले, तर निवडणुकीच्या वेळी आपणास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेत, या भीतीने इच्छुकांकडून पाणी मीटर बसविण्यास विरोध केला जात आहे. याशिवाय वाहतूक, अरुंद रस्ते या कारणांमुळेही कामाला खीळ बसत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

शहरात ज्या पद्धतीने मीटर बसवणे आवश्यक आहे, त्या पद्धतीने काम होत नाही. मीटर बसवण्यासाठी विरोध होतो. मीटर बसवले म्हणजे, लगेच मीटरप्रमाणे पाणीपट्टी वसूल होईल, असे नाही. जलसंपदा विभाग वारंवार महापालिका पाणी जास्त वापरत असल्याचा आरोप करत असते. शहरात सर्वत्र मीटर बसविल्यानंतर पाण्याचे मोजमाप करता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी आणि नियोजनासाठी हे आवश्यक आहे

               – अनिरुद्ध पावसकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख, महापालिका.

Back to top button