गणेशोत्सवातील डॉल्बीबाबत संदिग्धता | पुढारी

गणेशोत्सवातील डॉल्बीबाबत संदिग्धता

सातारा : पुढारी वृत्तसेवा बाप्पांचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर आले असताना नियम व अटींवर लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल. मात्र, आवाजाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे शांतता कमिटीमध्ये सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयावर डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. दरम्यान, प्रशासनाने आपली बाजू मांडताना डॉल्बीची वाहने दोन दिवसांत सील करण्याचा पवित्रा घेतल्याने डॉल्बीला परवानगी आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता झालेली नाही.

पोलिस करमणूक केंद्रामध्ये बुधवारी शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, कार्यकारी अभियंता जितेंद्र माने उपस्थित होते. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला गणेशोत्सव मंडाळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी अडचणी मांडल्या. या अडचणी मांडताना पोलिस व स्थानिक प्रशासनाचे उपस्थितांनी वाभाडे काढले.

एक खिडकी योजना जाहीर करता पण एक खिडकी कधीच दिसत नाही. डॉल्बी सगळीकडे वाजते मग सातार्‍यातच बंदी का? शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले असून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. महावितरण डिपॉझिटची रक्कम घेते, मात्र ती परत करत नाहीत. जाहिरात कमानीचा निर्णय पोलिस व पालिका प्रशासनाकडून कधीच वेळेत घेतला जात नाही व ते एकमेकांवर टोलवाटोलवी करतात. डॉल्बीला बंदी नसून त्याच्या डेसीबलला बंदी असताना पोलिसांकडून त्याचा अतिरेक केला जात आहे.

शहरात ठिकठिकाणी डंपरद्वारे उघड्यावरून मुरुम वाहतूक होत असून त्यामुळे चिखल होऊन अपघातांची मालिका सुरू आहे. अशाप्रकारे उपस्थित नगरसेवक शेखर मोरे, धनंजय जांभळे, श्रीकांत शेटे, नरेंद्र पाटील, चंद्रकांत मोरे, बंडू घाडगे, अरबाज शेख, हिम्मत मोहिते, गणेश दुबळे यांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. यावर उत्तर देताना प्रशासनाने असे सांगितले की, यंदा सर्वत्र लाईटची कामे सुरु असून लवकरच ती पूर्ण केली जातील. ज्यांचे डिपॉझिट द्यायचे राहिले आहे त्यांना तत्काळ ती दिली जातील. गणेेश विसर्जनासाठी कृत्रिम तळे यावेळीही केली जाणार आहेत. गौण खनिजाची जी उघड्यावरुन वाहतूक सुरु आहे ती झाकून केली जाईल. मिरवणूक मार्ग ठरलेला असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. यावर्षी मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. तात्पुरत्या तडीपारी कारवाईची प्रक्रिया सुरु असून गणेशोत्सव काळात ती प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

बैठकीमध्ये प्रशासनाने भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, डॉल्बीबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करु नये. लाऊडस्पीकरसाठी परवानगी दिली जाणार आहे. पोलिसांकडून अशी माहिती जाहीर करताच डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. मात्र स्पीकरचे डेसीबल तपासले जाईल. डेसीबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांपासून डॉल्बी मालकांची वाहने सील करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून पुन्हा एकदा अंतिम बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

डॉल्बीला परवानगी मिळाल्याचा दावा

सातारा शहर व परिसरामध्ये 7 वर्षांपासून डॉल्बीला बंदी आहे. सातारा शहर वगळता इतर सर्व शहरांमध्ये डॉल्बीला परवानगी देण्यात आली आहे. या दुजाभावामुळे परिसरातील साऊंड, लाईट, जनरेटर व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शासनाच्या अटींनुसार व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे. यासाठी व्यावसायिकांनी मंगळवारी आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजे भोसले यांनीही यासंदर्भात जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. याशिवाय उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले होते. त्यांच्या भूमिकेमुळे बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये डॉल्बीला पोलिसांनी परवानगी दिल्याचा दावा करत व्यावसायिकांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

Back to top button