ठाणे : पुढारी वृत्तसेवा : देशभरात स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरू असताना महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस नाईक अश्विनी गोकुळ देवरे यांनी कझाकीस्तानमध्ये तिरंगा फडकवला. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वूमनचा हाेण्याचा रेकॉर्ड केला. कझाकीस्तानमध्ये आर्यनमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी ४० ते ४४ वयोगटात महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील पोलीस नाईक अश्विनी देवरे या सहभागी झाल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धेतील ३.८ किमी स्वीमिंग, सायकलिंग १८० किमी व ४२.२ किमी धावणे सलग १७ तासांमध्ये पूर्ण करावे लागते. मात्र हे तिन्ही टप्पे अश्विनी यांनी १४ तास २४ मिनिटे ४६ सेकंदात पूर्ण केले. त्यांनी २ तास १ मिनिट ४२ सेकंदात स्वीमिंग, ७ तास ९ मिनिटे ३३ सेकंदात सायकलिंग व ४ तास ५३ मिनिटे ३२ सेकंदात रनिंग पूर्ण केले असून, त्यांचा स्पर्धेदरम्यानचा ट्रानिझिस्ट टाईम २० मिनिटे होता. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केल्याने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवात भारत देशाची प्रतिमा सातासमुद्रापार उंचावली आहे. ही स्पर्धा पूर्ण केल्याने अश्विनी देवरे यांना प्रशस्तीपत्र व मेडेल देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २००१ साली अश्विनी देवरे या मुंबई पोलीस दलात भरती झाल्या असून, सध्या जिल्हा बदली झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस खात्यातील कर्तव्य व संसार याची उत्तमरित्या सांगड घालत त्या श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ४० सुवर्ण, २१ रौप्य, २८ कांस्य पदके पटाकवले आहेत. आता आर्यनमन स्पर्धेत त्यांनी बाजी मारून महाराष्ट्र पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.
हेही वाचा :