बीड : भगरीतून एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा; धारुर तालुक्यातील घटना | पुढारी

बीड : भगरीतून एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा; धारुर तालुक्यातील घटना

धारूर; पुढारी वृत्तसेवा : धारुर तालुक्यातील जाहागिरमोहा येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना भगरीतून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर धारूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी वडवणी तालुक्यात भगरीतून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच हा दुसरा प्रकार उघडकीस आला. विजय फाटे (वय 14), कोमल फाटे (वय 16), लक्ष्मण फाटे (वय 10), पूजा फाटे (वय 13), अश्विनी फाटे (वय 32), सुनिता फाटे (वय 25), भारती फाटे (वय 7), इंदुबाई फाटे (वय 60), बाळासाहेब फाटे (वय 28), दिगंबर फाटे (वय 30) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे भगर सेवन केल्यानंतर 60 ते 70 जणांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. रविवारी रात्री जहिगीरमोहा येथे असाच प्रकार घडला. आषाढी एकादशीनिमित्त फाटे कुटुंबियांनी भगर सेवन केली होती. संध्याकाळी या सर्वांना मळमळ, चक्कर व उलट्यांचा त्रास सुरु झाला. यानंतर फाटे कुटुंबियांना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

सार्वजनिक कार्यक्रमातील भगर खाल्ल्याने विषबाधा

जहांगीर मोहा येथील फाटे वस्ती येथे सार्वजनिक कार्यक्रम होता. यावेळी भगर खाल्ल्याने 10 जणांना उलटी मळमळ पोटदुखीचा त्रास होऊ लागला. 3 रुग्णांना तपासून घरी सोडण्यात आले तर 7 जणांवर उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक सोळंके, समुदाय अधिकारी अझहर सय्यद, सुनील तिडके व आशा ताई यांनी जहागीर मोहा येथे भेट देऊन माहीती घेतली.

उपवास करत असाल तर काळजी घ्या

प्रत्येक घरात अनेकजण विविध दिवशी उपवास करत असतात. उपवासाला भगर व शाबूदाण्याचा फराळासाठी उपयोग केला जातो. मात्र भगरीमुळे अनेकदा विषबाधेचे प्रकार घडले आहेत. किराणा दुकानात जुनाट झालेल्या भगरीतून असा विषबाधेचा प्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button