जालना : कुंभार पिंपळगाव बाजारपेठ अंधारात; तीन दिवसांपूर्वी रोहित्र जळाले | पुढारी

जालना : कुंभार पिंपळगाव बाजारपेठ अंधारात; तीन दिवसांपूर्वी रोहित्र जळाले

कुंभार पिंपळगाव, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळाल्याने बाजारपेठेत तीन दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य आहे. वीजबिल वसुलीसाठी आग्रही असलेले महावितरण सेवा देण्यात मात्र अपयशी ठरत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

कुंभार पिंपळगाव हे बाजारपेठेचे गाव असून, या गावाची लोकसंख्या जवळपास वीस हजारांवर आहे. गावात विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात आठ दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. रोहित्रावर अति भार टाकल्यामुळे ते जळाले आहे. यामुळे बाजारपेठेतील वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद झाला आहे. जळालेले रोहित्र तीन दिवसांपासून दुरुस्त करण्यात आलेले नाही. महावितरण व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या नशिबी अंधार आला आहे.

गावात जवळपास वीस रोहित्र आहेत. मात्र, रोहित्राचे फ्यूज, केबल बॉक्स व तारा जीर्ण झाल्या आहेत. तारांच्या घर्षणाने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. मीटर नसल्याने, अनेक रोहित्रांवर आकडे टाकल्यामुळेच ते जळत आहेत. एखादे रोहित्र जळाले की दुसर्‍या रोहित्रावर भार टाकण्यात येत असल्याने तेही रोहित्र जादा भार झाल्याने जळत आहेत. ज्या ठिकाणी नवीन केबल टाकले आहेत त्या ठिकाणची रोहित्र वर्ष-वर्ष जळत नाही. रोहित्र जळण्याला जेवढे आकडे बहाद्दर जिम्मेदार आहेत तेवढेच या समस्येसाठी आकड्यांकडे दुर्लक्ष करणारे वीज वितरणचे अधिकारीही जबाबदार आहेत. दहा वर्षांपूर्वी 80 टक्के वसुलीचे गाव आज 30 टक्क्यांवर आले आहे. त्यासाठी महावितरण जबाबदार आहे.

योग्य रीडिंग न घेणे, अंदाजे अवाच्या सव्वा बिले देणे, बिल वेळेवर न देणे, वीज पुरवठा सुरळीत न करणे, प्रत्येक रोहित्राला एबी स्विच नसल्याने एका कामासाठी संपूर्ण गावठाण बंद ठेवणे, वारंवार रोहित्र जळणे आदी समस्या असल्याने गावकरी, व्यापारी तसेच विजेवर चालणार्‍या विजेच्या उपकरणांची छोटी, मोठी दुरुस्ती करून हातावर पोट भरणारे व्यावसायिक, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, दवाखाने अशी छोटे-मोठे सर्व व्यावसायिक यांचे व्यवहार ठप्प होत आहेत.

बाजारावर परिणाम कुंभार पिंपळगाव येथील महावितरणच्या गलथान कारभाराकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे कुंभार पिंपळगाव वासियांचे जीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेवरही खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम झाला. महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button