तब्बल 29 वर्षे बेटावर एकटा राहिलेला माणूस!
टोकियो : टॉम हँक्सचा ‘कास्ट अवे’ चित्रपट आठवतोय? एक माणूस बेटावर कोणत्याही आधुनिक सुख-सुविधांशिवाय एकटाच कसा राहत होता याची कथा यामध्ये आहे. अर्थातच जगाच्या पाठीवर असा अनुभव घेतलेले काही लोक आहेत. त्यामध्येच जपानच्या एका वयोवृद्ध माणसाचा समावेश आहे. हा माणूस सोतोबनारी बेटावर तब्बल 29 वर्षे एकटाच राहिला होता.
87 वर्षांच्या मासाफुमी नागासाकी यांना जपानमध्ये एक ‘नग्न साधू’ म्हणूनच ओळखले जाते. त्यांनी जवळजवळ तीन दशके एका ट्रॉपिकल आयलंडवर विवस्त्रावस्थेत, एकाकी जीवन जगण्यात घालवली. वयाच्या पन्नाशीपर्यंत ते आपल्या फोटोग्राफीच्या कामातून व शहरी जीवनातून कंटाळले होते. 1989 मध्ये त्यांनी आपली पत्नी व दोन मुलांचा त्याग केला आणि ते एकटेच सोतोबनारी बेटावर गेले. हे बेट जपानच्या मुख्य भूमीपासून शेकडो किलोमीटर दक्षिणेस असून त्याची रुंदी एक किलोमीटर आहे.
अतिशय हिरव्यागार अशा या बेटावर गोड्या पाण्याचे कोणतेही साधन नाही. मात्र, तरीही हा माणूस याठिकाणी 29 वर्षे आनंदात राहिला. 2018 मध्ये एका मच्छीमाराने त्यांना किनार्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले. त्यानंतर त्यांना तेथून शहरात आणले गेले व त्यांची कहाणी लोकांसमोर आली. वयोमानानुसार आता त्यांना बेटावर एकाकी राहण्यासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
इशिगाकी शहरात चार वर्षे राहिल्यानंतर आपले बेटावरचे घर शेवटचे एकदा पाहून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना 16 जूनला पुन्हा एकदा बेटावर नेण्यात आले. तिकडे जात असतानाच ते आनंदाने अश्रू ढाळत होते. बेटावर पोहोचताच त्यांनी पुन्हा एकदा अंगावरचे कपडे फेकून दिले व मोकळ्या हवेत श्वास घेतला! त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर फुललेलं हास्यच त्यांचा आनंद व्यक्त करीत होते.