देशमुख, सातपुते, मोहिते-पाटलांसह अनेकांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर | पुढारी

देशमुख, सातपुते, मोहिते-पाटलांसह अनेकांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने बंडखोर आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिवाय वरिष्ठांच्या आदेशाने उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार, पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार आहे, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे अक्‍कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर तालुक्याचे आ. सुभाष देशमुख, माळशिरसचे आ. राम सातपुते, पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान आवताडे तर बार्शीचे सहयोगी सदस्य आ. राजेंद्र राऊत असे सहा विधानसभेचे तर विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आ प्रशांत परिचारक हे दोन असे तब्बल आठ भाजपचे आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याला किमान दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पेाहचली आहे. यापूर्वी आ. सुभाष देशमुख यांना सहकार व पणन विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. आ. विजयकुमार देशमुख यांना परिवहन, कामगार कल्याण व इतर काही खात्याच्या पदभार देऊन राज्यमंत्री करण्यात आले होते. तसेच पालकमंत्री पदाची  जबाबदारीही विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली होती.

आता भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या बंडखोर आमदार तथा माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे, त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्याच्या वाट्याला किमान दोन मंत्रिपदे येतील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. या मंत्रिमंडळ स्थापनेत टीम देवेंद्र याचा प्रभाव अधिक दिसून येणार आहे. त्यामुळे फडणवीस समर्थकांना अधिकच अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते यांची नावे आघाडीवर आहेत. आ. सुभाष देशमुख ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांनाही या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मित्र पक्षाच्या गटाकडून अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे एकमेव आमदार सांगोल्याचे अ‍ॅड. शहाजी पाटील यांनाही या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आता कॅबिनेट की राज्यमंत्रिपद मिळणार, या बरोबरच पालकमंत्री कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसात मंत्रीपदाविषयी चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button