मिरजगावात दोन कोटींची वीजचोरी केली उघड: कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

मिरजगावात दोन कोटींची वीजचोरी केली उघड: कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मिरजगाव, पुढारी वृत्तसेवा: मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग व प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर महावितरणच्या भरारी पथकाने छापा घालूून वीज चोरीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. या कंपनीने गेल्या 17 महिन्यांत 1 कोटी 94 लाख 82 हजार 859 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत छत्रपती जिनिंग व प्रोसेसिंगचे मालक राहुल भारत पवार व दादासाहेब अण्णासाहेब बांदल यांच्याविरोधात नगर येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांनी फिर्याद दिली आहे. नगर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता गफ्फार शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, चाचणी विभागाचे सुधीर किनगे, उपकार्यकारी अभियंता धनंजय एकबोटे, प्रधान तंत्रज्ञ दत्तात्रय पोटकुले आदींच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

छत्रपती जिनिंग व प्रेसिंग कंपनीच्या वीज मीटरची 16 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तपासणी करण्यात आली. यावेळी वीज वापराची नोंद कमी करण्यासाठी नियोजनबद्ध व कायम स्वरूपाची व्यवस्था करून ठेवल्याचे निदर्शनास आले. कंपनीने 17 महिन्यांच्या कालावधीत एकूण 11 लाख 16 हजार 743 युनिटची चोरी केली असून, त्याची किंमत अधिभारासह 1 कोटी 94 लाख 82 हजार 859 रूपयांची इतकी होत आहे. दरम्यान, या घटनेने वीज चोरांमध्ये खळबळ उडाली असून, महावितरणने या वीज चोरांविरोधात मोहीम उघडण्याची गरज निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.

Back to top button