औरंगाबाद : अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात; टीचर महिलेला दोन लाखांचा गंडा | पुढारी

औरंगाबाद : अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात; टीचर महिलेला दोन लाखांचा गंडा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : यूके, यूएससारख्या परदेशातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन टीचरला सायबर भामट्यांनीच ऑनलाइन गंडा घातला. तुमच्या मुलांना परदेशातून चॉकलेट, गिफ्ट आणि टेडी पाठविले आहेत, अशी थाप मारून कस्टम ड्यूटी भरण्याची बतावणी करीत त्यांच्याकडून तब्बल एक लाख 95 हजार रुपये उकळले. पुढेही वेगवेगळ्या थापा मारून सायबर भामटा पैसे उकळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आला. हा प्रकार 10 ते 26 मे दरम्यान घडला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राखी दीपक खन्ना (36, रा. चिकलठाणा एमआयडीसी) या ऑनलाइन टीचर म्हणून नोकरी करतात. त्या यूएस, यूके व इतर देशातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन गणित, कम्प्युटर कोडिंगचे शिक्षण देतात. 10 मे रोजी त्या घरी असताना त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर डॉ. जॅकसन विलियन्स नावाने फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. ती रिक्वेस्ट राखी यांनी स्वीकारली. इन्स्टाग्रामवर त्यांची चॅटिंग सुरू
असतानाच 23 मे रोजी भामट्याने त्यांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाची मागणी केली. राखी यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून लगेचच मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅटिंग व बोलणे सुरू झाले. 23 मे रोजी भामट्याने राखी यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या मुलांसाठी चॉकलेट, गिफ्ट व टेडी पाठविल्याची बतावणी केली. 25 मे रोजी सकाळी पुन्हा फोन आला आणि त्यांनी दिल्ली एअरपोर्टवरून बोलत असल्याची थाप मारून पार्सल आल्याचे सांगत कस्टम ड्यूटी म्हणून 45 हजार रुपये भरायला सांगितले. राखी यांनी ती रक्कम फोन पेवरून जमा केली.

25 हजार पौंड आल्याची थाप

कस्टम ड्यूटी भरल्यानंतर पार्सल घरी येईल, असे राखी खन्ना यांना वाटत होते. मात्र, 26 जून रोजी भामट्यांनी पुन्हा संपर्क साधून पार्सलमध्ये 25 हजार पौंड असल्याची थाप मारून ते वाचवायचे असतील तर दीड लाख रुपये भरायला सांगितले. राखी यांनीही भामट्यावर विश्वास ठेवून 30, 45 आणि 75 असे एकूण दीड लाख रुपये भरले. त्यावर पुन्हा जीएसटी आणि टॅक्सची कारणे सांगून पैसे उकळणे सुरूच असल्याने राखी यांनी अधिक माहिती घेतली. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरुन एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.

Back to top button