

लातूर, पुढारी वृत्तसेवा : कार व आखाड्यावर छापा टाकून ४० लाखाच्या चंदनासह ६२ लाखांचा मुद्देमाल शुक्रवारी (दि.१७) सकाळी चाकूर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ अश्रृबा पुट्टे, (रा.सताळा, ता उदगीर), लतीफ अहमद कुट्टी, गिरीशकुमार वेल्लुतिरी (रा.केरळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोरी केलेले चंदन कबनसांगवी मार्गे एका कारमधून विक्रीस नेले जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक निकीतेन कदम यांना मिळाली होती. त्यावरून चाकुरचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मोहिते यांच्या पथकाने त्या मार्गावर सापळा लावला होता. दरम्यान, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास (एम एच १२जे सी ३९३५) ही कार त्या मार्गावरून वेगात जात असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्याने चालकास कार थांबवण्याचा इशारा केला. परंतु, कार तशीच पुढे गेली,पाठलाग करून कारची झडती घेतली असता त्यात ११ पिशव्या चंदन हाती लागले.
कारमधील साईनाथ अश्रृबा पुट्टे, यास अधिक विचारणा करुन शेतात नेले असता तेथे एका ट्रकमध्ये दोन माणसे चंदनाची लाकडे व साली भरताना दिसून आले. शेतातील उकिरड्याच्या बाजूस एक हौद दिसला त्याची तपासणी केली असता त्यात चंदनाची लाकडे व साल मिळून आली. सदर चंदन दोन टन (१९२७ किलो) असून त्याची किंमत चाळी लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चंदन कुठे नेले जाणार होते याचा अधिक तपास करण्यात येत आहे.