Raosaheb Danve : विधान परिषदेत महाविकास आघाडीचा पराभव करणार | पुढारी

Raosaheb Danve : विधान परिषदेत महाविकास आघाडीचा पराभव करणार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: राज्यसभेच्या निवडणुकीत ‘सतरंज का बादशहा’ देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना पराभूत केले. या निवडणुकीतील भाजपचा ‘प्लॅन ए’ हा आता विरोधकांना कळाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार असून यात केवळ एकनाथ खडसेंचा नव्हे, तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा पुन्हा पराभव करणार, असा दावा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांनी गुरुवारी (दि. १६) केला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

(Raosaheb Danve) राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी विधान परिषदेचा निकाल धक्कादायक असेल, असे विधान केल्याने त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, फडणवीस यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत प्लॅन ए तयार करून विरोधकांना पराभूत केले. हा प्लॅन महाविकास आघाडीला कळाल्याने तीच रणनिती आता वापरणार नाही.

विधान परिषदेसाठी आता भाजपचा प्लॅन बी तयार आहे. त्याचा वापर करून आमचे सर्व उमेदवार निवडून आणणार असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, खडसे यांना उमेदवारी न दिल्यास निवडणूक बिनविरोध करू, असा भाजपचा प्रस्ताव असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, असा कुठलाच प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. यावर फडणवीस आणि आपली चर्चा देखील झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कुठल्या व्यक्तीला नव्हे, तर पक्षाला पराभूत करण्याची तयारी भाजपने केली आहे. तेव्हा या निवडणुकीत खडसेंचाच नव्हे, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करू, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button