Ketaki Chitale : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम तुरूंगातच! | पुढारी

Ketaki Chitale : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम तुरूंगातच!

ठाणे, पुढारी ऑनलाईन : नवबौद्ध धर्मावर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला गुरुवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती केतकीच्या वकिलांनी दिली.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या 2020 प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला जामीन मंजूर केला.

मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर ॲक़्शन मोडमध्ये येत ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली. तिला याप्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळताच रबाळे पोलिसांनी ॲट्रोसिटीच्या प्रकरणात तिचा ताबा घेतला.

केतकी विरोधात 2020 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात नवबौद्ध धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकीने तिचे वकिल वसंत बनसोडे यांच्या मार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी या जामीनअर्जावर ठाणे न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी याप्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी (दि. 16) जामीनअर्जावर निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार, केतकी चितळे हिला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात देखील तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. कळव्यात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्जावर अद्याप न्यायालयाने सुनावणी राखून ठेवल्याने केतकीला सध्या तरी कारागृहात राहावे लागणार आहे. केतकी सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.

Back to top button