उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देण्याची कृती निषेधार्थ : राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे | पुढारी

उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देण्याची कृती निषेधार्थ : राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:  देहू गावातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. हा प्रकार चुकीचा आहे. तो कार्यक्रम भाजपने हायजॅक केला होता. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर टीका केली.

रावेत येथे बुधवारी (दि.15) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जगद्गगुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.14) झाला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. मात्र, त्यांना बोलू दिले नाही. गव्हाणे म्हणाले की, कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर शिष्टाचारानुसार अजित पवार यांना बोलू देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. संपूर्ण कार्यक्रम भाजपने हायजॅक केला होता. पवार यांना बोलू न देणे ही चुकीची पद्धत आहे. असे व्हायला नको होतो. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.

राजीनामा दिलेले पदाधिकारी पक्षातच
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्यावरून भाजप नाहक नाक खुपसत आहे. राष्ट्रवादी संघटनेचा विस्तार करीत आहे. नव्या व जुन्यांचा मेळ घालून सर्वच आघाडीवरील पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली जात आहे. पक्षाचे काम जोमात सुरू आहे. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची 368 पदाधिकार्‍यांची जम्बो कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. व्यक्तिगत अडचणीमुळे त्या तीन पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे, असे ते म्हणाले.

Back to top button