राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत मराठवाड्याच्या पदरी निराशा | पुढारी

राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत मराठवाड्याच्या पदरी निराशा

औरंगाबाद : उमेश काळे: राज्यसभा आणि त्यापाठोपाठ होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी मराठवाड्याला डावलल्याचे चित्र आहे. भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यानंतर राष्ट्रवादीकडून एखाद्या उमेदवाराला संधी मिळेल, असे वाटत होते; परंतु, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना अधिकृत उमेदवारी देऊन मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरविले आहे.

राज्यसभा निवडणुकीत मराठवाड्यातील पंकजा मुंडे वगळता अन्य एकाही नेत्याचे नाव पुढे नव्हते; परंतु भाजपने अमरावतीचे डॉ. अनिल बोंडे या ओबीसी नेत्याला संधी दिली. याशिवाय केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोल्हापूरचे धनंजय महाडीक हे या पक्षाचे अन्य दोन उमेदवार आहेत. राज्यसभेची निवडणूक शुक्रवार (दि. 10 ) रोजी असताना विधान परिषद निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. येत्या २० जून रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने एक जादा उमेदवार देत या निवडणुकीत चुरस आणली आहे. तशीच स्थिती विधानपरिषदेचीही केली आहे. दहा जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात पंकजा मुंडे यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा असताना त्यांना वगळण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांना धक्‍का बसला असून त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. तसेच गुरूवारी औरंगाबाद येथील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहावास मिळाले.

वास्तविक राष्ट्रवादीचे संजय दौड आणि भाजपचे सुजितसिंह ठाकूर, शिवसंग्राचे विनायक मेटे हे तीन मराठवाड्यातील आमदार सेवानिवृत झाले आहेत. त्यामुळे किमान भाजप किंवा राष्ट्रवादीने एका नेत्याला संधी देणे अपेक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजय दौड, बजरंग सोनवणे, अमरसिंह पंडित या तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना त्यांना उमेदवारी न देता ज्येष्ठ नेत्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने सचिन आहिर आणि अमाशा पाडवी यांना उमेदवारी देत चंद्रकांत खैरे यांचे मात्र, राजकीय पुनर्वसन केले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..

हेही वाचलंत का? 

Back to top button