बीड : बोगस वाळू टेंडर रद्द करण्यासाठी आमदार लक्ष्मण पवार यांचे जल आंदोलन | पुढारी

बीड : बोगस वाळू टेंडर रद्द करण्यासाठी आमदार लक्ष्मण पवार यांचे जल आंदोलन

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: गोदापात्रातील गंगावाडी (ता. गेवराई) येथील बोगस वाळू टेंडर दोन दिवसात रद्द करा, य‍ा मागणीसाठी आमदार लक्ष्मण पवारांचा आज शनिवारी (दि. ४ जुन २०२२) रोजी गोदापात्रात उतरून जल आंदोलन सुरू केले आहे.

गंगावाडी येथील नियमबाह्य बोगस वाळू टेंडर रद्द करण्यात यावा यासाठी दि. ३१ मे रोजी आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थित ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेऊन ठराव मंजुर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने लक्ष्मण पवार यांनी ग्रामस्थांसह दि. २ जुन रोजी गंगावाडीत उपोषण सुरू केले होते. यावेळी तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वत: हा गंगावाडीत उपोषण स्थळी भेट देऊन पवार व ग्रामस्थांस उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी आ. लक्ष्मण पवार व ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या उपस्थितीत गोदापात्रात उतरून पंचनामा केला आहे.

यावेळी अनेक बाबीत नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन खाडे यांच्यासमोर उघड केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे नियमबाह्य असल्याचे लक्षात आले आहे. ज्या सर्वे नबंर व गट नबंरमधुन वाळू लिलाव केला आहे. तिथे जाण्यासाठी साधा रस्ता सुध्दा नाही. तर तेथून वाळू उत्खनन झालेली नाही असे लक्षात येते तर टेंडर चालकाने दुसऱ्यांच्या गट नबंरमधुन बेकायदा वाळू उत्खनन केले आहे. त्यामुळे संबंधित टेंडर चालकावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आ. लक्ष्मण पवार व ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

गंगावाडी ग्रामपंचायतमध्ये सदरील वाळू घाटासाठी कुठलाही ठराव दिला नसताना सदरील टेंडर फाईलमध्ये जुलै २०२१ चा ग्रामपंचायतचा ठराव जोडलेला आहे. तो ठराव पूर्णपणे बोगस आसल्याचे संबधित ग्रामसेवक व सरपंच यांनी तहसीलदार सचिन खाडे व आ. लक्ष्मण पवार तसेच ग्रामस्थांसमोर सांगितले. त्यामुळे सदरील टेंडरच नियमबाह्य आहे. ते टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी आ. लक्ष्मण पवार व ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी केली होती.

टेंडर रद्द केले जात नाही म्हणून शनिवारी रोजी गोदावरी उतरून आ. लक्ष्मण पवार ग्रामस्थांनी जल आंदोलन सुरू केले आहे. यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button