

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 139 पैकी 100 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून द्या. मी शहराला पिण्यासाठी दररोज पाणी देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी 3 जून रोजी दिले. हे माझे शब्द घराघरात पोहचवा, अशाही सूचना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत महापालिका निवडणुकीचे रणशिंग पवार यांनी फुंकले.
शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी साठा राखीव आहे. त्या पाण्यावर शुद्धीकरणा प्रक्रियेसाठी चिखलीत केंद्र उभारले जात आहे. त्याची पाहणी शुक्रवारी अजित पवार यांनी केली. भविष्याचा विचार करून आणखी 200 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली.
पवार म्हणाले की, अगोदरच तयारी करून ठेवल्याने गरज पडल्यास आणखी पाणी उचलता येऊ शकेल. जलवाहिनीसह इतर कामांना विरोध न करण्याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना सांगितले आहे. प्राप्त झालेले पाणी शहराच्या सर्व भागांत पोहचविले जाईल. त्या दृष्टीने तातडीने नियोजन करण्याचा सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षासोबत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी पूर्वीपासून सकारात्मक आहे. प्रत्येक प्रभागातील पक्षाची ताकद लक्षात घेऊन मित्रपक्षांनी व्यावहारिकपणे जागांची मागणी करावी. व्यावहारिक भूमिका घेतल्यास मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू. अन्यथा नाईलाजास्तव एकला चलो रे…चा नारा द्यावा लागेल. शिवसेनेचे सचिन आहेर यांना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यास सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.