हिंगोली : सेनगावातील रेशनचा १९ क्विंटल तादूळ जप्त; दुकानदारासह दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : सेनगावातील रेशनचा १९ क्विंटल तादूळ जप्त; दुकानदारासह दोघांवर गुन्हा दाखल

सेनगाव ; पुढारी वृत्तसेवा: सेनगाव तालुक्यातील सापडगाव शिवारामध्ये एका बोलोरो पिकअप वाहनांतून स्वस्त धान्याचा १९ क्विंटल तांदूळ रिसोड येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदारासह रिसोड येथील दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.३०) रोजी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील स्वस्त धान्य दुकानदार बबन शिंदे यांच्या दुकानातील स्वस्त धान्याचा तांदूळ बोलोरो पिकअप वाहनाने रिसोड येथे विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे, जमादार अनिल भारती सुरेश पाईकराव यांच्या पथकाने सुकडी ते रिसोड मार्गावर सापडगाव शिवारात सापळा रचला.

वाहन व तांदूळ जप्त

दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक बोलोरो पिकअप रिसोडकडे जात असताना पोलिसांनी वाहन अडवले. वाहनातील गणेश लाखोरे व अरुण टेंबरे यांच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र, त्यांनी वाहनातील पोत्यात असलेल्या तांदळाबाबत पहिल्यादा उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहन व तांदूळ जप्त करून सेनगाव पोलिस ठाण्यात आणले.

पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त

तांदूळ सुकळी येथील स्वस्त धान्य दुकानदार बबन शिंदे यांच्याकडून घेण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी दिलेल्या तक्रारी दिली. यावरून सेनगाव पोलिसांनी गणेश सुखदेव लाखोरे, भुसार दुकानदार अरुण श्रीनिवास टेंबरे तसेच स्वस्त धान्य दुकानदार बबन धोंडीराम शिंदे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गणेश लाखोरे व अरुण टेंबरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button