कुकाणा-घोडेगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन | पुढारी

कुकाणा-घोडेगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

कुकाणा ते कौठा रस्ता पूर्ण उखडला असून, येत्या आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त न केल्यास कुकाणा येथील घोडेगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत हा रस्ता वाहतुकीलाच अडसर ठरत असून, बांधकाम विभाग मात्र निद्रितावस्थेत दिसत आहे.

कुकाणा ते देवगाव व पुढे फत्तेपूर ते कौठा हा रस्ता जागोजागी उखडला. कुकाणा ते देवगाव दरम्यान भगतवस्ती व गायकवाडवस्तीपासून देवगावपर्यंत रस्ता खड्डेमय झाला आहे. देवगाव ते फत्तेपूरपर्यंत अशीच अवस्था या रस्त्याची झाली आहे. फत्तेपूरच्या पुढे रस्तापूर फाट्याजवळ चारचाकी वाहने अडकतील असे खड्डे पडले आहेत.

‘आपले घर भक्कम असताना दुसरीकडे जायची गरज काय’

त्यापुढे पाटावरच्या पुलापासून ते कौठापर्यंत, तर चारचाकीच काय, दुचाकी चालवणेही मुश्किलीचे ठरत आहे. कुकाण्यासह परिसरातील देवगाव, फत्तेपूर, कौठा, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी, जेऊर हैबती, गेवराई, वाकडी, वडुले, भेंडा, सौंदाळा, देडगाव व देवसडेसह परिसरातील 25 गावांतील प्रवाशांना या रस्त्याने नगरला जावे लागते. गेल्या वर्षभरापासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाट लागली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागास जाग आणण्यासाठी आता संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जागोजागी रस्ता खचल्याने त्वरित दुरुस्तीची मागणी होत आहे. सरपंच अमोल अभंग, सरपंच दिनकर गर्जे, सरपंच महेश म्हस्के, सरपंच विष्णुदेव गायकवाड, सरपंच संदीप देशमुख, सरपंच भाऊसाहेब सावंत, तरवडीचे सरपंच जालींदर तुपे, सौंदाळा सरपंच शरद आरगडे, प्रा. नारायण म्हस्के, अजय रिंधे, मनोज हुलजुते, समीर पठाण, जावेद शेख, युनूस नालबंद आदींनी ही मागणी केली आहे.

पुण्याच्या विद्यार्थिनीची टॉयकॅथॉनमध्ये बाजी

खडीचे ढीग गेल्या सहा महिन्यांपासून

मार्गाच्या दुतर्फा दुरुस्तीसाठी आणून टाकलेले खडीचे ढीग गेल्या सहा महिन्यांपासून जागचे हलेनात. येत्या आठ दिवसांत पाऊस झाला, तर कुकाणा ते घोडेगाव रस्ता वातुकीसाठी बंद होईल. त्यामुळे येत्या 1 जूनपर्यंत हा रस्ता दुरुस्त झाला नाही, तर रस्ता बंद करण्याची नामुश्की बांधकाम विभागावर येणार आहे.

Back to top button