धुळे : नंदुरबारमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू; अतिदुर्गम भागात लालपरीमुळे आनंद साजरा | पुढारी

धुळे : नंदुरबारमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू; अतिदुर्गम भागात लालपरीमुळे आनंद साजरा

नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा): 
धडगांव तालुक्यातील अतिदुर्गम भाग नर्मदा नदीकाठावरील हुंडा रोषमाळ खुर्द येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा गावापासून सुरू होताच ग्रामस्थांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच विधिवत पूजा करून नारळ वाढवून लालपरीचे स्वागत करण्यात आले. बससेवा सुरू झाल्याने परिसरातील छोट्या गावातही बसफेर्‍या सुरू होणार आहेत. ज्येष्ठ सेवानिवृत कर्मचारी बलसिंग पावरा यांच्या हस्ते गावात आगमन झालेल्या पहिल्या लालपरीचे पूजन करण्यात आले.
हुंडा रोषमाळ गाव २४ वर्षापासूंन बससेवेच्या प्रतीक्षेत होते. हुंडा रोषमाळ ते धडगांव – मोलगी – अक्कलकुवा या मार्गाने हुंडा रोषमाळ खुर्द येथे मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली असून बससेवेमुळे नर्मदा काठावरील रोषमाळ खुर्द, ठुट्टल, चिचकाठी, बोरसिसा, गोराडी, पिंप्री, आमलीपाणी, अट्टी, केली, थुवाणी, भरड, सिक्का, कुंबरी, अकवाणी, नळगव्हण, कुकतार, जलोला अशा १९ गावातील नागरिकांना बससेवेची लाभ घेता येणार आहे. अक्कलकुवा ते हुडांरोषमाळ मधील एकूण अंतर ८५ किलोमीटर तर धडगांवपासून हुंडा रोषमाळ हे २४ किलोमीटर अंतर आहे. हुंडा रोषमाळहून धडगांव येथे बाजारासाठी जाणारे ग्रामस्थ, ज्येष्ठ व्यक्ती, रूग्णांना तसेच विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. हुंडा रोषमाळ खुर्द येथे बससेवा सुरु करण्यासाठी जि.प.सदस्या संगिता पावरा, माजी. जि. प. सदस्य, हारसिंगमल्या पावरा, धुळे विभागीय कार्यालय सहाय्यक वाहतुक अधिक्षक वडनेरे, अक्कलकुवा डेपोचे बाजीराव वसावे, अक्कलकुवा वाहतुक नियञंण अधिकारी दौलत पाडवी, चालक के. पी. पाटील, वाहक जयसिंग तडवी, तसेच नर्मदा परिसर विकास बहुउद्देशीय संस्था रोषमाळ खुर्द यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजय पावरा, पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button