नाशिक : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार | पुढारी

नाशिक : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील आडगाव व नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दींमध्ये अपघातात दोन जण ठार झाले आहेत. ओढा येथील जय तुळजा भवानी वजन काट्यासमोर शुक्रवारी (दि. २०) झालेल्या अपघातात संभाजी शिवाजी पवळे (३३, रा. एकलहरा) यांचा मृत्यू झाला. वजन काट्यासमोर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास एमएच १५ एचएच ८४१७ क्रमांकाचे हायवा वाहन उभे होते. त्यावेळी एमएच १५ सीएन ७५६६ क्रमांकाच्या दुचाकीवरून संभाजी पवळे जात होते. हायवाचालकाने वाहन उभे करताना पार्किंग लाइट किंवा कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने संभाजी यांची दुचाकी हायवावर आदळली. त्यात गंभीर मार लागल्याने संभाजी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात हायवाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तरुण ठार झाल्याची घटना नाशिकरोड येथील महात्मा गांधी रोडवर घडली. मुबीन गफ्फार मणियार (३२, रा. चितेगाव, ता. निफाड) हे सोमवारी (दि. २३) सकाळी ७.३०च्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून देवळाली गावाकडून बिटको पॉइंटच्या दिशेने येत होते. त्यावेळी एमएच १५ एफआर ३१४२ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने उलट दिशेने वाहन चालवून मुबीन यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात डोक्याला मार लागल्याने मुबीन यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार पसार झाला. त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button