काँग्रेसच्या हिंगोली जिल्हाध्यक्षांनी बांधले मुंबईत शिवबंधन | पुढारी

काँग्रेसच्या हिंगोली जिल्हाध्यक्षांनी बांधले मुंबईत शिवबंधन

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी अखेर शनिवारी मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे जिल्‍ह्यात  काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

हिंगाेली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्चस्व असलेले संजय बोंढारे यांनी २००७ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. या काळात त्यांनी कळमनुरी तालुक्यात काँग्रेसला अच्छे दिन दाखवले. आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद सदस्याच्या विजयासोबतच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ही काँग्रेसचा झेंडा फडकविला होता.

जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी त्यांनी तत्कालीन खासदार राजीव सातव, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासोबत संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी काँग्रेस वाढविण्याचे प्रयत्न केले. मात्र मागील काही दिवसात त्यांची पक्षांमध्ये चांगलीच कुचंबणा होऊ लागली होती. त्यामुळे बोंढारे शिवसेनेत प्रवेश करणार याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

शनिवारी मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाध्यक्ष राम कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत बोंढारे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शेषराव बोंढारे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय इंगळे यांची उपस्थिती होती. दरम्यान बोंढारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कळमनुरी तालुक्यामध्ये शिवसेनेला आणखी मोठे पाठबळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आता आखाडाबाळापुर ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. काँग्रेसकडे असलेला येहळेगाव तुकाराम जिल्हा परिषद गट व आखाडा बाळापूर जिल्हा परिषद गट पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

 

Back to top button