लातूर : 'या' शेतकऱ्याचा नादच नाय करायचा! गावातून मिरवणूक काढत ऊस कारखान्याला पाठवला | पुढारी

लातूर : 'या' शेतकऱ्याचा नादच नाय करायचा! गावातून मिरवणूक काढत ऊस कारखान्याला पाठवला

औसा (लातूर), पुढारी वृत्तसेवा : रात्रंदिवस कष्ट करून पोटच्या लेकरासारखा पोसलेला ऊस वेळेवर जात नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे व नाराजीचे वातावरण आहे. रात्रीचा दिवस करून पोसलेला ऊस डोळ्यासमोर वाळुन पाचट होत आहे. या उसासोबतच शेतकऱ्याचे स्वप्नदेखील बेचिराख होत आहेत. शेअर्स असलेल्या हक्काच्या कारखान्याकडून वेळेत ऊस गेला नाही. परंतु पर्यायी मार्ग म्हणून थोड्या प्रयत्नांती दुसऱ्या एका कारखान्याने तो ऊस नेला. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी संबंधित शेतकरी पठ्ठ्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची चक्क गावातून वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी मिरवणूक काढून ग्रामदैवतांना श्रीफळ अर्पण केले.

औसा तालुक्यातील भादा येथील नामदेव नागोराव बनसोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नामदेव बनसोडे या शेतकऱ्याचा जवळपास दोन एकर ऊस होता. तो ऊस वेळेत जावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. परंतु त्यांच्या नावाने ज्या कारखान्याचा शेअर्स आहे त्या कारखान्याकडून प्रयत्न करूनही वेळेत ऊस जात नव्हता. ही खंत मनात ठेवून त्यांनी आपला ऊस घालविण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत, असताना तालुक्यातील साई शुगर्स या खासगी कारखान्याचा फौजफाटा त्यांना उपलब्ध झाला. त्या कारखान्याकडून तोडणी सुरू झाली आणि दोनच दिवसांत डोकेदुखी झालेल्या त्यांच्या उसाचा प्रश्न मार्गी लागल्याने या शेतकऱ्याला मोठा आनंद झाला.

दरम्यान, बुधवारी (दि.१३) आपल्या उसाची शेवटची खेप जाणार असल्यामुळे, सदर शेतकऱ्याने त्या कारखान्याचे व फडावर काम करणाऱ्या कामगारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून एक उत्सवच साजरा करण्याचे जणू ठरवले असणार. या अनुषंगाने त्यांनी ऊस घेऊन जाणा-या वाहनांची सजावट तर केलीच, पण त्या वाहनांची आणि कामगारांची वाजत-गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातून तब्बल चार तास मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. ही मिरवणूक सुरू असताना सदरील शेतकऱ्यांकडून गावातील ग्रामदैवतांना श्रीफळ अर्पण करण्यात आले. या मिरवणुकीला लोकांनीही मोठी उपस्थिती लावून भरभरून व उत्साहात प्रतिसाद दिला हे विशेष. शेवटी काय तर म्हणतात ना, शेतकऱ्याचा नादच नाय करायचा..

हेही  वाचवत का ?

Back to top button