समरजितसिंह घाटगे यांना स्टंटबाजीची किंमत मोजावी लागेल : हसन मुश्रीफ | पुढारी

समरजितसिंह घाटगे यांना स्टंटबाजीची किंमत मोजावी लागेल : हसन मुश्रीफ

कागल : पुढारी वृत्तसेवा

आपल्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीतील मजकूर चुकीचा असेल, तर त्याच्याशी आपला काही संबंध नाही. ही जाहिरात आपण दिलेली नाही. संबंधित संस्था त्याचा खुलासा करेल. मात्र, याबाबत समरजितसिंह घाटगे हे स्टंटबाजी करीत आहेत. आमच्या पासंगाला देखील ते लागत नाहीत. त्यांच्या या स्टंटबाजीची भविष्यात त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

कागल येथील छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यानिमित्ताने त्यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांची ओळख करून देण्यात आली.

आम्ही वडाचे झाड, तर समरजित हे कुंडीतील रोपटे

चांगल्या कामाला काळा डाग लागत आहे. गोकुळ दूध संघाने दिलेली जाहिरात चुकीची असेल. या जाहिरातीच्या मजकुरावरून समरजित घाटगे सध्या स्टंटबाजी करीत आहेत. कार्यकर्त्यांनी याबाबत संयमाची भूमिका घ्यावी. त्यांना कोणीतरी मुद्दाम फूस लावत आहेत. आमचे झाड वडाचे आहे आणि समरजित हे कुंडीतील रोपटे आहे. सोन्याचा चमचा घेऊन ते जन्माला आलेले आहेत, असे मुश्रीफ म्हणाले. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांपासून रामनवमीला वाढदिवस साजरा केला जातो. हजारो कार्यकर्ते या दिवशी शुभेच्छा देतात. शुभेच्छा दिलेल्या कार्यकर्त्यांना नंतर आपण आभाराची पत्रे पाठवितो, असेही मुश्रीफ यांनी सांगितलेे.

राजर्षींनी यांनी सर्व जाती धर्मांच्या नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या. आपल्या राज्याचा खजिना खर्ची घातला; पण सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून वाद हे सर्व ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी आयोध्येच्या अगोदर कागलमध्ये श्रीरामाचे मंदिर उभारले. त्यांनी उभारलेल्या मंदिराचा आता अपमान केला जात आहे. घाटगे यांनी राम मंदिराचा सध्या राजकीय आखाडा बनवला आहे. राम मंदिरात होणार्‍या कार्यक्रमांचा हिशेब ते कधीही देत नाहीत, असे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले.

यावेळी हमिदवाडा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ईगल प्रभावळकर, श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, महेश घाडगे, नगरसेवक प्रवीण काळबर, प्रकाश कुराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अडीच वर्षांपासून गायब असलेले घाटगे आता बाहेर आले!

गेल्या अडीच वर्षांपासून गायब झालेले समरजित घाटगे आता बाहेर आले आहेत. सध्या आमच्या जन्माचा दाखला आणि आधार कार्ड, पॅन कार्ड शोधण्याचे काम सुरू आहे. रामनवमीला साजरा होणार्‍या वाढदिवसाबद्दल त्यांच्या पोटात इतके का दुखतेय कळत नाही. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज जातीयवादी वागत आहेत, याचे शाहू महाराजांना काय वाटत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Back to top button