मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार ! कोकणकन्या एक्सप्रेसच्या प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार ! कोकणकन्या एक्सप्रेसच्या प्रवाशांचे हाल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सिग्नल चुकीचा दिला गेल्‍याने आणि एकाच रुळावर दादर पुद्दुचेरी एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसचे डबे आल्‍याने या गाड्या एकमेकांना घासल्‍या. या धक्क्याने पुद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरुन झालेल्या अपघातात शुक्रवारी (दि.१५) रात्री लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

त्‍यातच रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी परंतु शुक्रवारी उशीराने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस सीएसएमटीलाच येणार असे रेल्‍वे प्रशासनाने सांगितले. प्रवाशांना अंधारात ठेवणाऱ्या मध्य रेल्वेने ऐनवेळी कोकणकन्या एक्सप्रेस ठाणे येथून सोडण्यात येणार असल्याची अनाउन्समेंट करतात प्रवाशांमध्ये उद्रेक झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी सीएसएमटी स्टेशन येथील व्यवस्थापकाला घेराव घातला. प्रवाशांचा उद्रेक बघून आरपीएफ जवान व पोलिसांना पाचारण करण्यात आले.

माटुंगा येथे दोन एक्सप्रेस गाड्यांमध्ये झालेला अपघात व कोकण रेल्वे मार्गावरील काही तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवारी रात्री पावणेदहा येणारी मांडवी एक्सप्रेस सीएसटीला आलीच नाही. मांडवी एक्सप्रेस न आल्यामुळे सीएसटीवरून रात्री 11.05 वाजता सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी प्लॅटफॉर्मवर ताटकळत बसून होते. अखेर कोकणकन्या एक्सप्रेस मध्यरात्री एक वाजता अशी अनाउन्समेंट झाली. पण एक वाजेपर्यंत गाडी न मिळाल्यामुळे पुन्हा 4 वाजता गाडी येणार अशी अनाउन्समेंट करण्यात आली. पण ऐनवेळी पावणे तीन वाजता कोकणकन्या सीएसएमटीला न येता ठाणे येथूनच मडगावला रवाना होईल, अशी अनाउन्समेंट करण्यात आली. मध्य रेल्वेच्या या सावळ्या गोंधळामुळे प्रवासी कमालीचे संतापले. रात्री दहा वाजल्यापासून सीएसएमटीच्या 18 नंबर प्लॅटफॉर्मवर आपल्या मुलाबाळांसह बसलेले प्रवासी स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालय घुसले.

प्रवाशांचा उद्रेक बघून आरपीएफ जवान व पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. यावेळी प्रवाशांनी गाडी ठाणे येथून चालवायची होती तर, अगोदर का सांगण्यात आले नाही, असा जाब व्यवस्थापकाला विचारला. एवढेच नाही तर प्रवाशांसाठी ठाण्यापर्यंत विशेष लोकल चालवावी, अशी आग्रहाची मागणी केली. त्यानुसार व्यवस्थापन वरिष्ठांशी संवाद साधला. मात्र विशेष लोकल सुरू करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे प्रवासी अजूनच संतापले. मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासाबद्दल व्यवस्थापकांना निदर्शनास आणून दिले. तरीही विशेष लोकल सोडलीच नाही.

त्यामुळे महिला प्रवासी व्यवस्थापकाच्या दालनात घुसल्या. तरीही काहीच मार्ग न निघाला नाही. उलट सीएसएमटी तेथून कसाऱ्याला जाणारी 04:19 ची पहिली लोकल पकडून ठाणे येथे जा, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा पारा अजूनच चढल्यामुळे व्यवस्थापकाने 4.05 वाजता ठाणेसाठी विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर प्रवाशांनी लोकल पकडून ठाणे गाठले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news