सातारा : जिल्ह्यातील ३९ विहिरींच्या पाणी पातळीत घट | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील ३९ विहिरींच्या पाणी पातळीत घट

सातारा : पुढारी वृत्तसेवा
भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील 106 विहीरींचा सर्व्हे करुन पाण्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये 39 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे. तर महाबळेश्‍वर तालुक्यात 0.38 मिटर, पाटण तालुक्यात 0.31 मिटर व फलटण तालुक्यात 0.62 मिटरने पाणी पातळी घटली आहे. तर 67 विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत वर्षातून तीन वेळा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विहिरींचे सर्व्हेक्षण केले जाते. त्यामधून त्या विहिरींचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. त्यानुसार भूजल पातळीच्या पाणलोट क्षेत्रनिहाय निश्‍चित केलेल्या निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेण्यात आल्या. त्या निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील जास्त पाऊस पडणार्‍या महाबळेश्‍वर तालुक्यात 3 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये 2 विहिरींच्या भूजल पातळीत 0.38 मिटरने घट झाली आहे.

पाटण तालुक्यात 10 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये 6 विहिरींचे भूजल पातळी 0. 31 मिटरने घटली आहे. तर फलटण तालुक्यात 12 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये 9 विहिरींच्या भूजल पातळीत 0.62 मिटरने घट झाली आहे. जावली तालुक्यात एका विहिरीच्या निरीक्षणात भूजल पातळीत 10 मिटरने वाढ झाली. कराड तालुक्यात 15विहिरीपैकी 7 विहिरींच्या भूजल पातळीत घट तर 8 विहिरींच्या भूजल पातळीत 0.22 मिटरने वाढ झाली आहे. खंडाळा तालुक्यात 5 विहिरींपैकी 3 विहिरीच्या भूजल पातळी घटली असून 2 विहिरींच्या पाणी पातळीत 0.29 मिटरने वाढ झाली आहे.

खटाव तालुक्यात 17 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये एका विहिरीच्या भूजल पातळीत घट दिसून आली तर 16 विहिरींच्या भूजल पातळीत 1.87 मिटरने वाढ झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील 9 विहिरींच्या निरीक्षणात 3 विहिरींच्या भूजल पातळीत घट तर 6 विहिरींच्या भूजल पातळीत 0.70 मिटरने वाढ झाली आहे. माण तालुक्यातील 16 विहिरींच्या निरीक्षणात 3 विहिरींच्या भूजल पातळीत घट तर 13 विहिरींच्या भूजल पातळीत 1.04 मिटरने वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील 10 विहिरींच्या निरीक्षणात 4 विहिरींच्या भूजल पातळीत घट तर 6 विहीरींच्या भूजल पातळीत 0.64 मिटरने वाढ झाली आहे. वाई तालुक्यातील 8 विहिरींच्या निरीक्षणात एका विहिरींच्या भूजल पातळीत घट तर 7 विहीरींच्या भूजल पातळीत 0.98 मिटरने वाढ झाली आहे.

पाण्याची सरासरी भूजल पातळी…

मार्च 2017 ते मार्च 2021 मधील भूजल पातळीची सरासरी जावली 3.10 मीटर, कराड 4.57 मीटर, खंडाळा 4.97 मीटर, खटाव 7.87 मीटर, कोरेगाव 6.48 मीटर, माण 7.59 मीटर, महाबळेश्‍वर 14. 12 मीटर, पाटण 4.13 मीटर, फलटण 6.59 मीटर, सातारा 4.75 मीटर तर वाई 7.37 मीटर इतकी आहे.

डिसेंबर महिन्यापासून सातारा जिल्ह्यात पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हळूहळू विहिरी व कुपनलिकेतील पाणी पातळी खोल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. पिकासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.
– डब्ल्यू. जे. बनसोडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सातारा

Back to top button