नांदेड : विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांची जलसमाधी | पुढारी

नांदेड : विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांची जलसमाधी

हदगाव, पुढारी वृत्तसेवा : इफ्को- टोकिओ विमा कंपनीने नदीकाठावरील पुराने बाधित आठ गावच्या शेतकऱ्यांचा सण २०२१-२२ चा उर्वरित विमा दिला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करत लक्ष वेधून घेतले. कयाधू- पैनगंगा नदीच्या संगमस्थळी असलेल्या मौजे बेलगव्हण येथे जवळपास एक ते दीड तास पाण्यात उतरून शेकऱ्यांनी आंदोलन केले.

मौजे माटाळा,बेलमंडळ,गोजेगाव, भानेगाव, वाकोडा, बेलगव्हण, धोतरा, बाभळी  या नदीकाठावरील आठ गावातील अतिवृष्टी व पुरामुळे संपूर्ण शेती बाधित झाली. बाधित शेतकऱ्यांना विमा कंपनीने १८ हजार रुपये जाहीर केल्याप्रमाणे न देता ७ हजार २०० रुपये दिले. तसेच २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे ५ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पीक बाधित झाल्याची विमा कंपनीने जाहीर केले. परंतु, पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनी व शासन दरबारी अनेक वेळा आंदोलने करून मागणी केली.

परंतु आंदोलनाची दाखल कोणीच घेतली नसल्याने  ११ एप्रिलरोजी शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन प्रल्हाद पाटील -सूर्यवंशी, रवी गोरे, नाथा हेंद्रे, शिवाजी तंत्रे, देवानंद वाघमारे, श्रीराम नवसागरे, सुदर्शन आढाव, बालाजी नरवाडे, नंदकिशोर वाकोडे, शिवाजी वानखेडे यांनी प्रशासनास दिले होते.

शेतकऱ्यांनी  कयाधू- पैनगंगा नदीच्या संगम स्थळ असलेल्या मौजे बेलगव्हण येथे पाण्यात उतरून जवळपास दीड तास आंदोलन केले.सदरील आंदोलनास तहसिलदार जिवराज दापकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रणवीरकर यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता दहा ते पंधरा दिवसात संबंधित शेतकऱ्यांना रक्कम दिली जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, जलसमाधी आंदोलननाच्या वेळी नदी काठावर मोठ्या प्रमाणत शेतकरी जमले होते. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button