भंडारा : भारनियमनाविरोधात शेतकऱ्यांचा नाना पटोलेंच्या निवासस्थानासमोर ठिय्या | पुढारी

भंडारा : भारनियमनाविरोधात शेतकऱ्यांचा नाना पटोलेंच्या निवासस्थानासमोर ठिय्या

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भारनियमन बंद करून नियमित ८ तास कृषीपंपाला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपुर, खोलमारा, तावशी, साखरा व चिकना येथील सुमारे २०० शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भारनियमनामुळे आठवडाभरापासून १ तासही पिकांना पाणी मिळत नसल्याने पीक उन्हाने वाळत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण कंपनी लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, आमदार पटोले यांचे स्वीय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्यांसमोरच महावितरणच्या अभियंत्यांना फोन लावला.

परंतु, महावितरणचे अधिकारी जोपर्यंत येथे येऊन अखंडित ८ तास वीज पुरवठ्याचे लेखी आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत ठिय्या सुरूच ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. दरम्यान, वीज वितरण अभियंत्यांनी ८ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात गोपाल झोडे, पतिराम झोडे, निलकंठ चौधरी, रवि सोनवाने आणि जैतपुर, खोलमारा, तावशी, साखरा, बारव्हा व चिकना येथील २०० शेतकरी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button