सातारा : कॉल रेकॉर्डमुळे सावकाराचे बिंग फुटले ; तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुढारी

सातारा : कॉल रेकॉर्डमुळे सावकाराचे बिंग फुटले ; तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सावकारांना कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश माणिक चव्हाण (वय २७, रा. महागाव ता.सातारा) असे तरुणाचे नांव आहे. या घटनेनंतर महेशच्या मोबाईलमध्ये एक कॉल रेकार्ड आढळला असून त्याद्वारे सावकारांचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी तीन सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. एकुलत्या एक व कर्त्या तरूणाचा जीव गेल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जात आहे.

गणेश अरविंद गायकवाड, प्रमोद नारायण गायकवाड (दोघे रा.क्षेत्रमाहुली, सातारा) व निलेश विष्णूपंत तांबोळी (रा. महागाव, ता.सातारा) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्तसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी मृत महेश चव्हाण यांचे वडील माणिक सोपान चव्हाण (वय ६२, रा. महागाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ६ एप्रिलरोजी महेश चव्हाण या युवकाने महागाव येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला होता. त्यानंतर पोलिसांनी महेश याचा मोबाईल तपासला असता यामध्ये एक धक्कादायक रेकॉर्डिंग मिळाले. या रेकॉर्डिंगमध्ये एक सावकार महेश याला अश्लील शिवीगाळ करत आहे. तसेच ‘तू पैसे दिले नाहीस, तर तुझा जीव काढल्याशिवाय राहणार नाही’, अशी एकजण दमबाजी करत आहे. हा कॉल दि.६ एप्रिलरोजी रेकॉर्डिंग झाले असून या घटनेतूनच महेश घाबरला व अस्वस्थ होत त्याने आयुष्य संपवल्याचे कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button