गोवा : काँग्रेस प्रवक्ते ॲड. यतीश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

गोवा : काँग्रेस प्रवक्ते ॲड. यतीश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्य काँग्रेसचे माजी सरचिटणीस आणि प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी आज (दि.११) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पणजी येथील भाजपच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपाचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यतीश नाईक व त्यांच्या समर्थकांना रितसर प्रवेश दिला.

यावेळी अॅड. यतीश नाईक यांनी म्हणाले की, निवडणूकपूर्वी आपण तृणमूल काँग्रेसमध्ये सरचिटणीस या पदावर होतो. त्यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होतो. तृणमूल पक्षाची तत्वे आपल्याला पटली नाहीत. त्यामुळे आपण निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर निवडणूक झाली या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा विकास आणि स्थिरता हे मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरला आणि गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या बळावर भाजपने लोकांकडे मते मागितली. गोमंतकीय मतदारांना स्थिरता आणि विकास हे मुद्दे पटले आणि मतदारांनी भाजपला २० जागा दिल्या.

मलाही विकास आणि स्थिरता हे मुद्दे पटले आणि त्यामुळे आपण निवडणुकीनंतर भाजपमध्ये दाखल होण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज आपण भाजपात दाखल झालो आहे. आपण अनेक वर्षे काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून काम केले आहे. या अनुभवाचा लाभ भाजपाला करुन देणार आहे. पक्ष सांगेल ते काम आपण करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

यतीश नाईक यांच्या राजकीय अनुभवाचा आम्हाला फायदा होणार आहे. त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा विचार निवडणुकीपूर्वी आपल्याकडे खासगीत व्यक्त केला होता. आज प्रत्यक्षात ते पक्षामध्ये येत आहेत. त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे आपण स्वागत करत असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button