हिंगोली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आजीला मारहाण | पुढारी

हिंगोली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आजीला मारहाण

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सिरसम बुद्रूक येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मुलीस व तिच्या आजीला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात आज (मंगळवार) गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथील एक अल्पवयीन मुलगी सिरसम बुद्रुक येथे तिच्या आजीकडे आली होती. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून गावातील संतोष विठ्ठल खोडके हा पाणी पिण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरात गेला. यावेळी त्याने मुलीचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलीने आरडाओरड केली. मात्र, संतोष याने मुलीच्या मानेला धरून आपटले. मुलीचा आवाज ऐकून शेजारी असलेली तिची आजी सोडवण्यासाठी आली असता त्यांना देखील संतोष याने जमिनीवर आपटून जखमी केले.

सदर प्रकार सांगण्यासाठी मुलगी व तिची आजी संतोष याच्या घरी गेली असता त्या ठिकाणीही त्याने दोघींना मारहाण केली. त्यानंतर आजीच्या घराचे नुकसान केले. याप्रकरणी सदर मुलीने बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष खोडके याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश मनपिल्लू, उपनिरीक्षक सुरेश भोसले, जमादार खंडेराव नरोटे, मगन पवार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button