महाविकास आघाडी सरकारचा काँग्रेसच पाठिंबा काढेल : रामदास आठवले | पुढारी

महाविकास आघाडी सरकारचा काँग्रेसच पाठिंबा काढेल : रामदास आठवले

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काँग्रेसच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर आहे. त्यामुळे काँग्रेसच या महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेईल, आणि सरकार कोसळेल, असे सुतोवाच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas athavale) यांनी आज (शनिवार) येथे केले.

गायरान हक्क परिषद व मेळाव्याच्या निमित्त केंद्रीय मंत्री आठवले शहरात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी  रिपाईंचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, डी. एन. दाभाडे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, पप्पू कागदे, अ‍ॅड. यशपाल कदम आदी उपस्थित होते.

आठवले (Ramdas athavale) म्हणाले की, समता प्रस्थापित झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्रातील मोदी सरकार सर्व घटकांना सोबत घेवून विकासाचे प्रश्‍न मार्गी लावत आहे. त्यामुळेच भारतीय रिपब्लिकन पक्ष एनडीएमध्ये आहे. चार राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत याच कारणांमुळे दलित समाज हा भाजपच्या पाठिशी असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या मतदानाचे प्रमाण ३२ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आले आहे. या पक्षापासून दूर गेलेला घटक भाजपकडे वळला असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनतेच्या प्रश्‍नाचे काहीही देणे-घेणे नसून आपसांतीलच बेबनावात हे सरकार मश्गूल आहे. काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, हे शिवसेनेने लक्षात घेवून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत न राहता भाजपसोबतच यावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्याच काही आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. या बाबींचा विचार करून शिवसेना भाजपसोबत आल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार साकारेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button